पाण्यातून प्रकटले १६ व्या शतकातील चर्च

chruch
मेक्सिको: धरणाच्या तलावात जलसमाधी मिळालेले १६ व्या शतकातील चर्च भयंकर दुष्काळामुळे तलावातील पाण्याच्या पातळीच्या वर आले आहे. हे चर्च पाहण्यासाठी उत्सुक नागरिकांची मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे.

‘सेंटीयागो अपोस्टल’ या चर्चची उभारणी डॉमिनिकन धर्मगुरूंनी १६ व्या शतकात केली होती. सन १९६६ मध्ये ग्रिजाल्वा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या बुडीत क्षेत्रात हे चर्च पाण्याखाली गेले. या धरणामुळे क्यूचुला येथील मूळ रहिवासी असलेल्या जोक्यू जमातीच्या हजारो नागरिकांनाही स्थलांतर करावे लागले होते.

chruch1

या वर्षी पडलेल्या प्रचंड दुष्काळामुळे धरणाच्या पाण्याची पातळी मोठया प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे १५ मीटर उंचीच्या या चर्चच्या इमारतीचा अर्धा भाग पाण्याच्या वर आला आहे. केवळ अवशेषांच्या स्वरूपात शिल्लक राहिलेल्या या इमारतीच्या पडक्या भिंतींवर झुडपे उगवली असून त्यावर अनेक पक्षांनी आपली घरटी बांधली आहेत.

chruch2

ही चर्चची इमारत पाण्याच्या वर आल्याने लोकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता लक्षात घेऊन जवळच राहणाऱ्या अल्वारेज डियाज यांनी या इमारतीपर्यंत घेऊन जाणारी नौका सेवा सुरू केली आहे.यापूर्वी सन २००२ मध्येही पाण्याची पातळी घटल्याने चर्चची संपूर्ण इमारत पाण्याच्या वर आली होती.

Leave a Comment