नवी दिल्ली – जगप्रसिद्ध ताजमहालावरील रोषणाईच्या झगमगाटावर तज्ज्ञांनी आक्षेप घेतला असून या मोगलकालीन वास्तूचा मार्बलचा पृष्ठभाग रोषणाईमुळे आकर्षित होणाऱ्या किड्यांच्या विष्ठेमुळे खराब होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
ताजमहालास धोकादायक ठरतो आहे रोषणाईचा झगमगाट
१७ व्या शतकातील वारसास्थळावर सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणी कमी क्षमतेचे लाइट्स काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी पर्यटकांना ताजमहाल पाहता यावा आणि ही वास्तू प्रकाशाने उजळावी, असा दुहेरी हेतू त्यामागे आहे, असे भारतीय पुरातत्त्व विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. परंतु या रोषणाईमुळे ताजमहालाच्या मार्बलवर थेट प्रकाश पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर किड्यांची समस्या निर्माण झाली आहे. त्यांच्या विष्ठेमुळे पृष्ठभागावर डाग पडत आहेत. परिणामी ताजचे अमीट सौंदर्य नष्ट होत आहे, असे पुरातत्त्व अधीक्षक (विज्ञान शाखा) एम. के. भटनागर म्हणाले.