इस्लामाबाद : भारत-पाकमध्ये अशा बातम्या कमीच येतात. अशातच पाकिस्तानच्या इक्बाल लतीफ यांनी सर्वांची वाहवा लुटली. इक्बाल हे पाकिस्तानात डंकिन डोनट्स या अमेरिकी फूड चेन शाखेचे मालक आहेत. गेल्या आठवडाभरापासून ते गांधीगिरी करीत आहेत.
भारतीयांना पाक रेस्टॉरंटमध्ये मोफत जेवण
ते भारतातून लघु मुदत वा व्हिजिटर व्हिसावर पर्यटन वा कामानिमित्त आलेल्यांना मोफत जेवू घालतात. हा उपक्रम सुरू केल्यापासून त्यांच्या दुकानावरील विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे. डंकिनच्या इस्लामाबाद, लाहोर, पेशावरमध्ये २६ शाखा आहेत. त्यात त्यांनी आजवर २,४३२ भारतीयांना जेवू घातले आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्कराचाही त्याला आक्षेप नाही. लष्कर आणि आयएसआयमधील आपल्या मित्रांनी या उप-क्रमाची स्तुतीच केली असल्याचा इक्बाल यांचा दावा आहे. ते म्हणाले, लोकांनी प्रेम, शांतता आणि सलोख्याने राहण्यासाठी महात्मा गांधीजी यांनी प्रयत्न केले. त्यांची ही शिकवण अमलात आणण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. आम्ही फक्त इतकेच सांगू इच्छितो की, दोन्ही देशांच्या नागरिकांचे एक-मेकांवर खूप प्रेम आहे. भरकटलेले काही लोक आमच्यात विष कालवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही आम्ही सांगू इच्छितो, त्यांनी समजूतदारपणा दाखवावा, प्रेमाने वागावे.