सरकारी बँकांच्या खातेदारांकडे ५९ हजार कोटी थकित

sbi
नवी दिल्ली : आपल्या कामासाठी कर्जदार नेहमीच बँकांकडून वेळोवेळी कर्ज उचलतात. व्याज दर कमी असल्याने ब-याच जणांचा कल सरकारी बँकांकडे असतो. परंतु या बँकांचे खातेदारांकडे तब्बल ५९ हजार कोटी रुपये कर्ज थकित आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांच्या खातेदारांकडे सर्वाधिक रक्कम थकित आहे.

एसबीआय आणि यांच्याशी संबंधित पाच बँकांचे जाणीवपूर्वक कर्ज बुडविणा-यांची संख्या १ हजार ६२८ आहे. या खातेदारांकडे ३१ मार्च २०१५ पर्यंत १६ हजार ८३४ कोटी रुपये थकित असल्याची नोंद आहे. याबरोबरच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्ज थकित असलेल्या खातेदारांची संख्या ७२२ आहे. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया (६४३) आणि कॅनरा बँक (६१२) यांचा क्रमांक लागतो. एकूण रकमेचा विचार करता राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक आघाडीवर आहे. या बँकेच्या ४१० खातेदारांकडे ७ हजार २८२.२५ कोटी रुपये थकित आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पीएनबीनंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा क्रमांक लागतो. या बँकेच्या थकित कर्जाची रक्कम ४,४२८.६२ कोटी रुपये आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या ३८२ खातेदारांकडे ३ हजार ८७७.४४ कोटी रुपये थकित आहेत. याबरोबरच युको बँकेच्या ५९४ खातेदारांकडे ४ हजार ६७७.०८ कोटी रुपये थकित आहेत. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, अशा प्रकारच्या ७५ टक्के थकित कर्जदारांच्या कर्जाची पुनर्रचना करून वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अर्थात, बँकांनी आता कारवाई सुरू केली असून, थकित कर्जदारांकडून कर्ज वसूल करण्यात येणार आहे.

मुळात आपल्या वैयक्तिक कामासाठी कर्ज घेतल्यानंतर त्याची वेळेत परतफेड करणे आपले कर्तव्य असते. परंतु ब-याचदा काही मंडळी जाणीवपूर्वक कर्ज परतफेड करण्यास टाळाटाळ करतात किंवा काही मंडळी कर्ज माफ होईल, असा चुकीचा विचार करून कर्ज परतफेड करीत नाहीत. याबाबत अनेकदा बँका पाठपुरावा करतात. परंतु कर्जदार त्याचा गांभीर्याने विचार करीत नाही. याच कोत्या विचारातून थकित कर्जाचा आकडा वाढत गेला आहे. परंतु हे पैसे कधी ना कधी फेडावेच लागतात. त्यामुळे याचा विचार करून कर्जदारांनी या पैशांची परतफेड करणे आवश्यक आहे. अन्यथा याचा फार मोठा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

Leave a Comment