व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा जुना रस्ता ४५ वर्षांनंतर खुला

valley-of
नंदादेवी नॅशनल पार्क आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मिळून जागतिक वारसा यादीत नोंद झालेल्या स्थळी जाण्याचा ४५ वर्षांपूर्वीचा जुना मार्ग पुन्हा एकदा खुला झाला आहे. यामुळे पर्यटकांना या व्हॅलीचा किंवा फुलदरीच्या दर्शनाचा सर्वांगाने आनंद लुटणे शक्य होणार आहे. हिमालयाच्या कुशीतील ही स्वर्गीय दरी पुन्हा एकदा पर्यटकांच्या चाहुलीने गुंजणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १९७० साली चमोली जिल्ह्यातून या दरीत जाण्यासाठी वापरण्यात येणारा मार्ग ग्लेशियरखाली दबला गेला होता. या मार्गाने हनुमान चट्टीपासून कुंठखाल पर्यंत पायी ट्रेक करता येत असे. त्या काळात या भागात असलेल्या ब्रिटीश लोकांसाठी हा ट्रेक विश्रांतीचे आणि मनाला शांत करण्याचे महत्त्वाचे ठिकाण होते. आता नंदादेवी प्रशासन पार्कने दीड कोटी रूपये खर्चून हा दबलेला मार्ग पुन्हा खुला केला आहे आणि रूंदही केला आहे.

समुद्रसपाटीपासून ३९६२ मीटर्स उंचीवर म्हणजे साधारण १२ ते १३ हजार फुटांवर हा ८७ चौरस किलोमीटरचा परिसर निसर्गाच्या अद्भूत चमत्काराने दिपलेला असतो. येथे साधारण ३०० विविध प्रजातीची फुले फुलतात. त्यात निळी पॉपी, ब्रह्मकमळ, ऑरेंज पॉनीटेल अशा विविध जातीच्या आणि रंगाच्या फुलांचा समावेश आहे. बर्फाळ प्रदेशात हे चमकदार आणि मनमोहक रंग जणू स्वर्गीय सौंदर्याची अनुभूती देतात. हिमालयाच्या पहाडांना ही फुले जणू विविध रंगांनी शाल पांघरतात आणि नजर जाईल तेथेपर्यंत हा रंगीत गालिचा दिसून येतो. हा ट्रेक साधारण २५ किमीचा असून त्यासाठी किमान १७ तास पायी चालावे लागते. त्यात ११ किमीची खडी चढणही आहे. ४५०० मीटर उंचीवर कुंठरवाल येथे पोहोचता येते आणि तेथेच स्वर्गीय ब्रह्मकमळ पाहायला मिळते.

Leave a Comment