एअरसेलची मोफत इंटरनेट सेवा

aircel
नवी दिल्ली : सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनव्या ऑफर वेगवेगळ्या कंपन्यांकडून ग्राहकांना दिल्या जात आहेत. यात मोबाईल कंपन्याही मागे नाहीत. मोबाईल कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ऑफर्सची जोरदार स्पर्धा सुरू आहे. आता या कंपन्यांपैकी एअरसेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी देशभर मोफत इंटरनेट सेवा देण्याचे संकेत दिले आहेत. साधारणपणे वर्षभरात सर्व ग्राहकांना ही सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी अनुपम वासुदेव यांनी दिली आहे.

मोबाईल इंटरनेटच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने एअरसेल कंपनीने मोफत इंटरनेट सेवा देण्याचे ठरविले आहे. प्रत्येक व्यक्तीची इंटरनेटपर्यंत पोहोच असली पाहिजे. केवळ काही लोकांपर्यंतच संपर्क नसावा, असे वासुदेव यांनी म्हटले आहे. तामिळनाडूमध्ये मोफत मुलभूत इंटरनेट सेवा आम्ही सुरू केलेली आहे आणि एका वर्षात ही सेवा संपूर्ण देशभरात उपलब्ध करण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कंपनी आपल्या फ्री बेसिक इंटरनेट प्रोग्राम अंतर्गत ६४ केबी प्रति सेकंदच्या डाऊनलोड स्पीडसह ही सेवा दिली जात आहे. एअरसेलचे उपाध्यक्ष सुनील खुट्टम यांनी म्हटले आहे की, नवीन ग्राहकांसाठी ही इंटरनेट सेवा तीन महिन्यांपर्यंत मोफत आहे आणि त्यानंतर ते सक्रिय राहात असतील तर त्यांना एका महिन्यासाठी किमान १५० रुपयाचे रीचार्ज करावे लागणार आहे. एअरसेल कंपनी येत्या डिसेंबरपर्यंत देशभरात १३ हजार मोबाईल साईटस स्थापित करणार आहे. याबाबतची गेल्या महिन्यात कंपनीने घोषणा केलेली आहे. यामध्ये २ जी, ३ जी आणि ४ जी साईटचा समावेश आहे. ५३०० साईट २ जी आणि ७७०० साईटचा ३ जी आणि ४ जी नेटवर्कसाठी असणार आहे. ३ जी साईट मुख्यता तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि ओडिशा सर्कलमध्ये आहे. मोबाईल सेवांची वाढती मागणी आणि ग्राहकांंसाठी दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने ही योजना तयार केली आहे.

एअरसेल कंपनीने देशभरातील आपल्या सर्व ग्राहकांना मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, असे संकेत देऊन ऐन दसरा-दिवाळी सणाच्या तोंडावर खळबळ उडवून दिली आहे. यानंतर इतर कंपन्यांनी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर घेऊन येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment