आणखी एका बँकेचा ५५० कोटी रुपयांचा घोटाळा उघड

scam
नवी दिल्ली- व्यापाराच्या नावाखाली होणा-या काळय़ा पैशाच्या हस्तांतराचा आणखी एक घोटाळा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उघड केला आहे. हे प्रकरण बँक ऑफ बडोदाप्रमाणेच असून यामध्ये ५५० कोटी रुपये गुंतल्याचा संशय आहे. आठ भारतीय आणि एका परदेशी बँकेचा सहभाग असून या बँकांच्या माध्यमातून हाँगकाँग आणि चीनमध्ये काळा पैसा पाठवण्यात आला.

अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणात गाझियाबादमधील फॉरेन एक्स्चेंज एजंट मनीष जैनला अटक केली असून प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. २००६ आणि २०१०मध्ये ओरिएंटल बँकेच्या राजपूर शाखेतून आयातीच्या नावाखाली ५०५ कोटी रुपये हस्तांतर केल्याचे उघड झाले आहे. ओरिएंटल बँकेच्या शाखेतील ६६ खात्यांतून हे हस्तांतर हाँगकाँगमधील एचएसबीसी बँकेत करण्यात आले.

तेथून ते चीनमधील कथित पुरवठादारांना पाठवण्यात आले. ओरिएंटल बँकेबरोबरच एनसीआर क्षेत्रातील आयएनजी वैश्य, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड, धनलक्ष्मी बँक, येस बँक आणि डीसीबी या बँकांचाही जैन याने अशा घोटाळय़ात वापर केल्याची शक्यता अंमलबजावणी संचालनालयाने वर्तवली आहे.

Leave a Comment