‘सौदी’ने मारून घेतला पायावर धोंडा: तज्ज्ञांची टीका

petrol
न्यूयॉर्क: काळ्या तेलाचे उत्पादन वाढवून जगभर पेट्रोलियमचा महापूर आणण्याचा सौदी अरेबियाचा निर्णय हा स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणारा ठरला; अशी टीका नायजेरियाच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर, तेल उत्पादक देशांच्या ओपेक या संघटनेचे मानद सदस्य मोहंमद सानुसी यांनी केली.

पेट्रोलियम उत्पादनांच्या बाजारपेठेत अमेरिकेशी स्पर्धा करण्यासाठी सौदी राजघराण्याने तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाने तेलाचे भाव ढासळले. यातून सौदीला कोणता फायदा झाला हा देखील प्रश्नच आहे; असे सानुसी यांनी स्पष्ट केले. मागील चार दशकात सौदी राजघराण्याने ही चूक अनेकदा केली असल्याचेही ते म्हणाले.

सध्या सौदीसारख्या श्रीमंत देशाला आर्थिक चणचण भासत आहे. याला कारणीभूत राजघराण्याचे चुकीचे निर्णय आहेत. त्यांच्या निर्णयाचा फायदा ना त्यांना झाला ना इतरांना; अशी टीकाही त्यांनी केली. सन १९७० आणि ८० मध्येही सौदीने तेलाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेलाचे दर प्रति बॅरल १० ते १५ डॉलर्सनी कमी झाले. त्यामुळे सौदीचेही नुकसान झाले आणि इतर तेल उत्पादक देशांचेही; अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment