भारतात क्रोमा चेनमध्ये उघडणार अॅपल स्टोर्स

croma
मुंबई – अॅपल ने भारतात इलेक्ट्रोनिक्स चेन क्रोमाशी पार्टनरशीप केली असून त्यांच्या स्टोर्समध्येच अॅपल स्वतःची स्टोर्स सुरू करणार आहे. या संदर्भातली घोषणा नुकतीच केली असून प्रायोगिक तत्त्वावर सध्या अशी सहा स्टोअर्स सुरू केली जात आहेत. अॅपलची ही स्टोअर्स त्यांच्या सिग्नेचर वूडन टेबल्ससहीत असतील आणि ग्लोबल मॉडेलनुसार असतील असेही समजते.

या संदर्भात बोलताना टाटाची मालकी असलेल्या इनफिनिटी रिटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित मित्रा म्हणाले भारतात अॅपल स्टोअर्स लाँच करण्यासाठी आमच्याबरोबर झालेल्या भागीदारीचा आम्हाला अभिमान आहे. ही स्टोअर्स अॅपलच्या जगभरातील मॉडेल स्टोर्सनुसार असतील व आमच्या क्रोमामध्ये त्यांच्यासाठी ४०० ते ५०० चौरस फूटांची जागा दिली जाईल. येथे अॅपलची प्रत्येक रेंजमधील सर्व उत्पादने मिळतील. सध्या मुंबईतील मालाड, जुहू, ओबेरॉय हॉल, फिनिक्स मॉल, घाटकोपर या ५ क्रोमा स्टोअर्समध्ये त्याची सुरवात केली जाईल. बंगलोरच्या जयनगर येथील क्रोमामध्ये सहावे स्टोअर असेल. ही स्टोअर्स दिवाळीत सुरू होतील.

त्यासाठी अॅपलच्या सेल्स स्टाफला कंपनीतर्फे प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या अॅपल फ्रँचायजी मॉडेल एक्स्लुझिव्ह ब्रँड स्टोअर्स रिसेलर्सच्या माध्यमातून त्यांची उत्पादने भारतात विकत आहे.

Leave a Comment