हजारो कोटींच्या बँक घोटाळ्यात सहा जण गजाआड

Bank-of-Baroda
नवी दिल्ली: बँक ऑफ बडोदाच्या तब्बल सहा हजार कोटींच्या घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने चौघांना; तर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना गजाआड केले आहे.

बँकेच्या अशोक विहार शाखेमधील ५९ खात्यांमधून ६ हजार कोटी रुपयांची रक्कम दुबई आणि हॉंगकॉंग येथील काही कंपन्यांच्या खात्यांमध्ये बनावट आयात निर्यात व्यवहारांच्या नावाखाली वर्ग करण्यात आली. या प्रकरणी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय संयुक्तपणे तपास करीत आहेत.

या प्रकरणी सीबीआयने शाखाधिकारी सुरेशकुमार गर्ग आणि परकीय चलन व्यवहार प्रमुख जैनिस दुबे यांना अटक केली आहे. या घोटाळ्याच्या तपासासाठी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने अनेक ठिकाणी छापे घातले; तसेच अनेक बँक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. यावेळी बँक अधिकाऱ्यांपैकी काही जणांनी या व्यवहारात मध्यस्ताची भूमिका पार पडल्याचे उघडकीला आले होते.

अशाच प्रकारे सुमारे डझनभर कंपन्यांसाठी मध्यस्थी करणाऱ्या कमल कार्ला याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने एचडीएफसी बँकेच्या फोरेक्स विभागात काम केले आहे आणि या व्यवहारात प्रत्येक डॉलरमागे ३० ते ५० पैसे कमिशन मिळाल्याचे त्याने कबूल केले.

Leave a Comment