अब्जावधींचा व्यवसाय असणारे भारतातील ५ टॉप गुरू

baba
भारतात मुळातच बाबा, गुरू, संत,माता यांची कमतरता नाही. मात्र यातील कांही गुरूंनीच आपल्या उत्पादनांनी नामवंत कंपंन्यांसमोर चांगलेच आव्हान उभे केले आहे. इतकेच नव्हे तर कांही गुरूंची उत्पादने दीर्घकाळ बाजारात प्रस्थापित आहेत. योगगुरू रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांसाठी बिग बझारबरोबर नुकताच करार केला असून व्यवसायाची नवी दिशा दाखवून दिली आहे तर दुसरीकडे एमएफसीजी क्षेत्रातील कंपन्यांना या गुरूंच्या उत्पादनांची आपली धोरणे आखताना दखल घ्यावी लागत आहे. देशातील अशा पाच टॉप गुरूंची ही ओळख

१) रामदेवबाबा
ramdev-baba
योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठ, दिव्य योग मंदिर ट्रस्ट ने आज जगभरात आपल्या उत्पादनांना बाजार मिळविला आहे. जगभरात प्रसिद्धी मिळविलेले रामदेवबाबा १५ वर्षांपूवी हरिद्वारमध्ये प्रस्थापित होण्यासाठी कडक संघर्ष करत होते मात्र आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल २ हजार कोटींवर गेली असून येत्या दोन वर्षात ती ५ हजार कोटींवर नेण्याचा त्यांचा मानस आहे. पतंजली योगपीठ, दिव्य फार्मसी मंदिर ट्रस्टची ही उत्पादने देशविदेशात वितरीत केली जातात. तसेच आयुर्वेद कॉलेज, चिकित्सालय, योग ग्राम, फूड व हर्बल पार्कमधूनही त्यांना या ट्रस्टला चांगलीच मिळकत होते.

२) माता अमृतानंदमयी देवी
mata-amrutamayi
सुधामणी इदमन्नेल असे मूळ नांव असलेल्या माता अमृतानंदमयी जगभरात अम्मा नावानेही प्रसिद्ध आहेत. जगाचे दुःख दूर करण्याची शक्ती असलेल्या आणि प्रत्येक भाविकाची गळाभेट घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या संत मातांच्या ट्रस्टकडे १५०० कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. त्यात परदेशातून येणार्‍या देणग्यांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय विश्व विद्यापीठम कॉलेज, अमृतामयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, केरळातील शाळा असेही त्यांचे व्यवसाय आहेत. केरळातील शाळांचे शुल्क टॉप खासगी शाळांपेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जाते. त्यांचा टीव्ही चॅनलही आहे शिवाय आईसलंड येथे असलेल्या पाच मजली भव्य आश्रमातूनही त्यांना खूप पैसा मिळतो.

३) श्रीश्री रविशंकर
shrishri-ravishankar
जगभर अध्यात्मिक गुरू अशी ओळख असलेल्या श्रीश्री रविशंकर यांचा जन्म तमीळनाडूतला. सहाव्या वर्षीच ते वेद शिकले आणि १७ व्या वर्षी वैदिक लिटरेचरचे विद्वान बनले. त्यांच्या ट्रस्टची संपत्तीही १ हजार कोटींवर असून त्यात मुख्य कमाई आर्ट ऑफ लिव्हींग फौंडेशनच्या माध्यमातून होते. शिवाय विद्यामंदिर ट्रस्ट, पीयू कॉलेज बंगलोर, श्रीश्री मिडीया सेंटर युनिर्व्हसिटी, अमेरिकेतील आर्ट ऑफ लिव्हींगचे हेल्थ व एज्युकेशन सेंटर हे त्यांच्या कमाईचे अन्य स्त्रोत आहेत.

४) आसाराम बापू
asaram-bapu
लैगिक अत्याचारांच्या आरोपावरून गेले वर्षभर जेलमध्ये असलेले आसारामबापू १० हजार कोटींच्या संपत्तीचे मालक असल्याचे सांगितले जाते. अहमदाबादच्या मोटेरा येथील आश्रमातून त्यांची मुख्य कमाई होते. देशविदेशात त्यांचे ३५० आश्रम व बाल संस्कार केंद्रे असून त्यातूनही प्रचंड पैसा मिळतो. कोट्यावधी रूपये किमतीच्या जमिनी सोडल्या तरी त्यांची बँक अकौंट, शेअर्स ची किमत १० हजार कोटी असल्याचे सांगितले जाते. बदमानी होऊनही आसारामबापूंचे भक्तगण आजही त्यांच्याच उत्पादनांचा वापर करण्यास प्राधान्य देतात. त्यांच्या अनेक आश्रमांवर पोलिसांनी जप्ती आणली आहे.

५) गुरमीत रामरहिमसिंह इन्सान
ram-rahim
बाबा रहिम या सुटसुटीत नांवाने ओळखले जाणारे बाबा रामरहिम यांचे दोन चित्रपट नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत तसेच त्यांचे म्युझिक अल्बमही अतोनात लोकप्रिय बनले आहेत. हरियाणातील सिरसा येथे त्यांच्या मालकीची ७०० एकर शेतजमीन असून राजस्थानात १७५ बेडसचे रूग्णालय आहे. शिवाय गॅस स्टेशन, मार्केट कॉम्प्लेक्सही आहेत. जगभरात त्यांचे २५० आश्रम आहेत. देशविदेशात म्यझिक कॉन्सर्ट करूनही ते प्रचंड कमाई करतात.

Leave a Comment