चीनमधील मंदीचा आशियाला फटका ?

china
लिमा : चीनमधील आर्थिक मंदीचा फटका जगाला तर बसेलच, पण आशिया-पॅसिफिक प्रांतातील देशांना त्याची सर्वाधिक झळ बसणार आहे, असा स्पष्ट इशारा जागतिक बँकेने शनिवारी आपल्या ताज्या अहवालातून दिला आहे.

आतापर्यंत चीनची झपाट्याने विकास करणारी जगातील दुस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था मानली जात होती. पण, गेल्या काही महिन्यांपासून चीनमध्ये भीषण आर्थिक संकट निर्माण झाले आहे. विकास दर विक्रमी नीचांकावर आल्याने चीनला आपल्या चलनाचे अवमूल्यनही करणे भाग पडले आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल सध्या नकारात्मक दिशेने सुरू असल्याने त्याचा परिणाम संपूर्ण आशिया-पॅसिफिक प्रांतातील देशांवर पडणार आहे, असे जागतिक बँकेच्या शनिवारी जारी झालेल्या अहवालात नमूद आहे.

आर्थिक सुधारणा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात चीन सरकारला आलेले अपयश किंवा चुकीच्या व्यवस्थापनामुळे आर्थिक आघाडीवर बसलेल्या धक्क्यांमुळेच चीनच्या अर्थव्यवस्थेला आज इतके वाईट दिवस पहावे लागत आहेत. देशांतर्गत खर्च वाढत असताना, त्यावर आळा घालण्यात चीनला आलेले अपयश हेदेखील यामागील एक कारण असू शकते, असेही जागतिक बँकेचे मत आहे.

अर्थव्यवस्थेत समतोल साधण्यासाठी चीन सरकारकडून प्रयत्न सुरू असले, तरी ते फार जास्त प्रभावी नसल्यामुळे मागणीत कमालीची घट झाली आहे आणि त्याचा परिणाम प्रादेशिक विकासाची गती कमी होण्यावर झाला आहे. चीनमधील आर्थिक मंदीचा फटका आशिया-पॅसिफिक देशांनाही सोसावा लागणार आहे, असेही यात नमूद आहे.

Leave a Comment