चेन्नई – पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने मतदार ओळखपत्र ऑनलाइन मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे ओळखपत्र मोबाईलवरही उपलब्ध होणार असून अशी सुविधा देणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
तामिळनाडूत मिळणार ऑनलाईन मतदार ओळखपत्र
याबाबत अधिक माहिती देताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संदीप सक्सेना म्हणाले कि, मतदारांना ओळखपत्रासाठी अर्ज करणे, त्यात दुरुस्त्या करणे आणि प्रत्यक्ष ओळखपत्र प्राप्त करणे ही सुविधा देणारे ‘ईजी’ हे मोबाईल अॅप आणि ऑनलाईन वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. यामुळे मतदारांना सुविधा मिळण्याबरोबरच एकापेक्षा अधिक मतदार ओळखपत्र घेण्याला आळा बसणार आहे. या सुविधेद्वारे अर्ज करणाऱ्या मतदारांना १५ दिवसात ओळखपत्र मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या सुविधेसाठी जमा करण्यात आलेली माहिती समविष्ट करून निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे काम सुरु असून १६ ऑक्टोबर रोजी या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात येईल अशी माहीत सक्सेना यांनी दिली.