कर्करोगाच्या निदानासाठी नवे अॅप

tnm-app
मुंबई: टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कर्करोगाचे निदान व उपचारांसाठी मार्गदर्शक ठरणारे मोबाइल अॅप्लीकेशन विकसित केले आहे. विशेषत: रुग्णाचा कर्करोग नेमक्या कोणत्या स्तरावर आहे; हे समजून घेण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरणार आहे. ‘टीएनएम’ असे या अॅपचे नाव आहे.
या अॅपमुळे देशभरातील डॉक्टरांना; विशेषत: भौगोलिक दृष्ट्या दुर्गम भागात राहून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना कर्करोगाचे निदान करण्याबरोबरच त्याची तीव्रता जाणून घेण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे ६५ प्रकारच्या कर्करोगांपैकी कोणत्या कर्करोगाला कोणत्या प्रकारच्या आणि किती क्षमतेच्या औषधांची योजना करावी; याचे मार्गदर्शन या अॅपमुळे मिळेल; असा दावा या अॅपच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या डॉ. राजेंद्र बडवे आणि डॉ पलक पोपट यांनी केला.

हे अॅप एकदा डाउनलोड केल्यानंतर त्याचा ऑफलाइन वापर करता येतो. हे अॅप इंटरअॅक्टिव्ह असून आवश्यक माहिती त्यात भरल्यानंतर ३० सेकंदात कर्करोगाची तीव्रता समजू शकते; अशी माहिती डॉ मीनाक्षी ठाकूर यांनी दिली. हे अॅप जगभरातील डॉक्टरांना विनामूल्य डाउनलोड करता येणार आहे. त्याच्या वापराबद्दल १९ देशांमध्ये चाचणी घेण्यात आली आहे.

या अॅपमध्ये डॉक्टरांबरोबरच रुग्ण आणि त्यांचे कुटुंबिय यांना उपयुक्त सुधारणा करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे प्रबोधन होणार आहे. रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोणती काळजी घ्यावी; याची माहिती त्यात देण्यात येणार आहे. ही सुधारणा फेब्रुवारी २०१६ पर्यंत करण्यात येईल; असे डॉ बडवे यांनी सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही