दुर्गाउत्सवात यंदा १०० फुटी दुर्गा

durga
यंदाच्या दुर्गापूजेनिमित्त दक्षिण कोलकाता येथील देशप्रिय पार्क व स्टार सिमेंट यांनी संयुक्त सहकार्यातून भव्य दुर्गामूर्ती उभारण्याचे काम हाती घेतले असून ही मूर्ती तब्बल १०० फूट उंचीची असेल असे समजते. गेले कांही दिवस या संदर्भातील जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत मात्र त्या नक्की कशाबद्दल आहेत याचा खुलासा होत नव्हता.

स्टार सिमेंटचे सीईओ संजय कुमार म्हणाले देशप्रिय पार्क पुजा कमिटी आणि स्टार सिमेंट कंपनीने हा भव्यदिव्य प्रकल्प हाती घेतला आहे. प्रसिद्ध मूर्तीकार मिंटू पाल यांच्याकडे ही कामगिरी सोपविली गेली आहे. मिंटू यांनी यापूर्वी ६२ फुटी दुर्गा मूर्ती साकारली आहे व ते आता स्वतःचाच विक्रम मोडण्यासाठी सिद्ध झाले आहेत. त्यांनी या संदर्भात चीनला नुकतीच भेट दिली असल्याचेही समजते. तेथील २५० फुटी बुद्ध मूर्ती पाहण्यासाठी मिंटू गेले होते.

सुमारे ४० कलाकार ही मूर्ती साकारत आहेत. फायबर ग्लासमध्ये बनविली जात असलेली ही मूर्ती देशप्रिय पार्कच्या मध्यात चबुतर्‍यावर स्थापन केली जाणार आहे. या प्रकल्पावर आत्तापर्यंत अडीच कोटी रूपये खर्च केले गेले आहेत. मूर्तीसाठीच सुमारे ५० लाख रूपये खर्च येणार आहे. १९ आक्टोबरपासून चार दिवस चालणार्‍या दुर्गापूजा उत्सवात येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन आत्तापासूनच गर्दी व्यवस्थापन व सुरक्षा व्यवस्था केली गेली आहे. गिनीज बुकमध्ये या मूर्तीची नोंद केली जावी यासाठीचा अर्जही दाखल केला गेला असल्याचे समजते.

Leave a Comment