जगाला आर्थिक विकासासाठी अतिरिक्त खांदे हवेत

arun-jaitley
न्यूयॉर्क : चीनशिवायही आणखी काही खांद्यांची जगाला आर्थिक विकासासाठी गरज असून सध्या अतिशय वेगाने विकास करीत असलेल्या भारताला आपला खांदा देण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे व्यक्त केले. वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक पारित करणे हेच सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जेटली येथील कोलंबिया विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संबोधित करताना म्हणाले की, भारताविषयी जगाच्या अपेक्षा वाढत आहेत आणि हे फार चांगले संकेत आहेत. भारताने आता असा टप्पा गाठला आहे, जिथे सहा आणि आठ टक्के विकासदरावर समाधान मानणे योग्य ठरणार नाही. नऊ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त विकास दर गाठायला हवा, असे भारतीयांना मनापासून वाटते. भारताच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारने अतिशय वेगाने हालचाली करायला हव्या, यासाठी जर सरकारवर सर्वच स्तरांवरून दबाव येत असेल, तर त्याला मला गैर असे काहीच दिसत नाही, असेही जेटली यांनी सांगितले. जगाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी चीन हा अतिशय चांगला खांदा आहे, यात वाद नाही. पण, आता आणखी एक मजबूत खांदा भारताच्या रूपात तयार झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात हातभार लावण्याची संधी भारताला मिळाली आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Comment