कॅलिफोर्निया देणार स्वेच्छा मरणाचा हक्क

brain-dead
कॅलिफोर्निया: मोठ्या वादविवादानंतर दुर्धर आजाराने मृत्युशय्येवर खितपत पडलेल्या रुग्णांना वैद्यकीय देखरेखीखाली स्वेच्छा मरणाचा हक्क देणाऱ्या कायद्याच्या विधेयकावर कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्राऊन शिक्कामोर्तब केले आहे. हा हक्क देणारे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील ५ वे राज्य आहे.

ज्या व्यक्तीचे आयुष्य केवळ सहा महिन्यांपुरते शिल्लक आहे आणि जी व्यक्ती स्वत:च्या मरणाचा निर्णय घेण्याएवढी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे; अशा व्यक्तीला वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आवश्यक ती औषधे देऊन वेदनारहित मृत्यू देण्याची तरतूद या कायद्यात आहे. मात्र किमान दोन वैद्यकीय तज्ज्ञांनी संबंधित व्यक्ती सर्व निकष पूर्ण करीत असल्याचा निर्वाळा देणे आवश्यक आहे. या कायद्याची अंमलबजावणी १ जानेवारी पासून केली जाणार असून मुदतवाढ न दिल्यास १० वर्षात हा कायदा संपुष्टात येईल.

या कायद्यासाठी मरणाच्या हक्कासाठी झगडणाऱ्यानी अनेक दशकांपासून प्रयत्न करूनही तला यश येत नव्हते. सभागृहात तब्बल ६ वेळा हे विधेयक दप्तरी दाखल करण्यात आले होते. अखेर मागील महिन्यात हे विधेयक संमत करण्यात आले.

ब्रिटनी मायनार्ड हा २९ वर्षाच्या युवतीला मेंदूचा कर्करोग होता. तिने स्वेच्छा मरणाचा कायदा नसल्याने कॅलिफोर्नियामधून ऑरेगॉन राज्यात स्थलांतर केले होते. या वृत्ताला अमेरिकेत मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर स्वेच्छा मरणाच्या हक्काच्या मागणीने पुन्हा उचल घेतली.
मात्र रोमन कॅथोलिक चर्च, धार्मिक संस्था आणि विकलांगांच्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या संस्थांनी या कायद्याला कसून विरोध केला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment