एअरटेल भारतात सर्वप्रथम आणणार फाईव्ह जी

5gwifi
थ्रीजी, फोरजी सेवा भारतात उपलब्ध करून देण्यात रिलायन्स जिओ व एअरटेलने आघाडी घेतली असतानाच भविष्यात फाईव्ह जी सेवा भारतात प्रथम उपलब्ध करून देण्यासाठी एअरटेलने योजना आखली असल्याचे समजते. एअरटेलचे अध्यक्ष सुनीलकुमार मित्तल या संदर्भात माहिती देताना म्हणाले, आम्ही फाईव्ह जी साठी फ्रेमवर्क सुरू केले आहे आणि त्यासाठी जगातील सर्वात मोठी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी चायना मोबाईलबरोबर करारही केला आहे. या दोन कंपन्या मिळून फाईव्ह जी साठी इक्विपमेंट विकसित करणार आहेत.

भारतात फाईव्ह जी सेवा सुरू होण्यासाठी आणखी किमान सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागेल असेही सांगितले जात आहे. सरे विद्यापीठातील संशोधकांनी फाईव्ह जी तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेतल्या आहेत आणि त्या यशस्वी झाल्या आहेत. या सेवेमुळे इंटरनेट अधिक वेगवान बनणार असून त्याचा वेग सध्याच्या फोर जी पेक्षा किमान ६५हजार पट अधिक असेल म्हणजे १ सेकंदात या सेवेमुळे ३० चित्रपट डाऊनलोड करता येतील असे समजते.

मोबाईल फिफ्थ जनरेशन असे या नेटवर्कला म्हटले जाते. त्याच्या संशोधनाची सुरवात २०१० मध्येच झाली होती आणि मुख्यतः मोबाईल इंटरनेट लक्षात घेऊनच ते विकसित केले गेले आहे.साधारण २०२० सालात ते वापरात येईल आणि त्याचा मुख्य उपयोग प्रचंड प्रमाणावर डेटा ट्रान्स्फरसाठी होऊ शकेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment