गुप्तहेर एका मेसेजने करतात मोबाईल हॅक: स्नोडेन

Snowden
लंडन: ब्रिटीश गुप्तहेर केवळ एक मेसेज पाठवून आपल्याला हवा त्याचा मोबाईल हॅक करून त्यावरील संभाषण, माहिती, छायाचित्र दूरवरून मिळवू शकतात; असा दावा माहिती सुरक्षा चळवळीचा प्रवर्तक आणि अमेरिकेचा माजी सुरक्षा अधिकारी एडवर्ड स्नोडेन यांनी केला आहे.

ब्रिटनच्या शासकीय दळणवळण मुख्यालयाला ब्रिटीश नागरिकांवर नव्हे; तर त्यांच्या मोबाईल फोनवर नियंत्रण प्रस्थापित करायचे आहे; असे सांगून स्नोडेन म्हणाले की या मुख्यालयाकडून स्मर्फ सूट या उपकरणाचा अपार केला जातो. नोजी स्मर्फ या उपकरणामुळे फोन स्वीच ऑफ असला तरीही गुप्तहेर त्याचा मायक्रोफोन सुरू करू शकतात. ट्रॅकर स्मर्फ आणि ड्रीमी स्मर्फ या उपकरणांच्या सहाय्याने स्मार्टफोन दुरूनही चालू अथवा बंद करता येतात.

केवळ एक मेसेज पाठवून दळणवळण मुख्यालय कोणाच्याही मोबाईलच्या सॉफ्टवेअरवर नियंत्रण मिळवू शकतात आणि ते मोबाईलधारकाला कळू शकत नाही. यामुळे फोनवरील संभाषण दुरून ऐकता येते किंवा रेकॉर्डही करता येते. त्याचप्रमाणे फोनमधील कोणतीही माहिती मिळविता येते; असे स्नोडेन यांनी सांगितले.

ब्रिटीश सरकारने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुप्तहेर संस्थाना अधिक अधिकार देण्याचे निश्चित केले आहे. स्नोडेन यांनी उघड केलेल्या माहितीबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास ब्रिटीश सरकारने नकार दिला आहे.

Leave a Comment