२ महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला झाला दूधसागर धबधबा

dudhsagar
बेळगाव : पर्यटनासाठी धोकादायक ठरलेला दूधसागर धबधबा अनेक निर्बंध घालून १ ऑक्‍टोबरपासून पर्यटकांना खुला केला असून यामुळे पर्यटकांत समाधान व्यक्‍त करण्यात येत आहे. हा धबधबा मागील दोन महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद होता.

देशात उंचीच्या मानाने दूधसागर धबधब्याचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे हे नयनरम्य ठिकाण पाहण्यासाठी बेळगावसह गोवा, कोल्हापूर, हुबळी, धारवाड आदी भागांतून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात. पण याठिकाणी पर्यटकांची मोठी संख्या, त्यामुळे होणाऱ्या हुल्लडबाजीमुळे हा धबधबा पर्यटकांसाठी बंद केला होता. याच ठिकाणी दोघा युवकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हे पर्यटन स्थळ पर्यटकांच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत त्यावर बंदी घातली होती.

आता वन खात्याने नवी मार्गदर्शक तत्त्वे तयार करून दूधसागर धबधबा काही निर्बंध घालून पर्यटकांसाठी खुले केले आहे. रोज सकाळी ८.३० ते दुपारी ३.३० पर्यंत पर्यटन स्थळ पाहता येणार आहे. हे पर्यटन स्थळ भगवान महावीर राष्ट्रीय अभयारण्यात समाविष्ट असल्यामुळे वन खात्याच्या कायद्यांचे पालन करावे लागणार आहे. केवळ पर्यटनस्थळाजवळ २२५ वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. वन खात्याकडे नोंदणी असलेल्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार असून खासगी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. पर्यटन स्थळाकडे जाताना प्रत्येक पर्यटकाला लाईफ जॅकेट घालणे आवश्‍यक आहे.

दूधसागर पर्यटन स्थळाकडे कॅसलरॉकमार्गे रेल्वे रुळावरून येण्यास निर्बंध घातल्यामुळे वन खात्याच्या या निर्बंधाचे पालन करूनच पर्यटकांना दूधसागरचा आनंद लुटता येणार आहे. अधिक माहितीसाठी उत्तर गोव्याच्या वन खात्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment