तूरडाळ २०० रूपयांची पातळी गाठणार

toor
दिल्ली- बहुतेक भारतीयांच्या रोजच्या आहारात असणारी तूरडाळ किमतीचा नवा उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तविली जात असून येत्या कांही दिवसांत तूर आणि उडीद डाळी २०० रूपये किलोपर्यंत झेप घेतील असा अंदाज आहे. सध्या बाजारात सर्वच डाळींचे भाव तेजीत आहेत. सरकारने भाव नियंत्रणासाठी डाळी आयातीचा निर्णय घेतला असून त्यानुसार तूरडाळीची आयात सुरूही झाली आहे. तरीही गेल्या पंधरा दिवसांत तूर आणि उडीद डाळीचे भाव किलोमागे २५ रूपयांनी वाढले असून या डाळी सध्या १७० रूपये ते १८० रूपयांच्या दरम्यान आहेत.

सप्टेंबरमध्ये वास्तविक डाळींची आवक बाजारात वाढू लागते व त्यामुळे भाव उतरतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र यंदा पावसाने दिलेली ओढ आणि अवकाळी पाऊस यामुळे डाळी उत्पादक राज्यांत डाळींच्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याचे दिसून येत आहे. परिणामी बाजारात म्हणावी त्या प्रमाणात डाळींची आवक होत नाही व त्यामुळे दरवाढ अटळ बनली आहे. सध्या बाजारात मूग डाळही १०० रूपयाच्या पुढेच असून हरबरा डाळ ६० ते ७० रूपये किलोने विकली जात आहे.

Leave a Comment