झुकेरबर्ग आणि जॉब्जला मार्ग दाखविणारा आश्रम

nim-karolli
उत्तराखंड राज्यातील नैनीतालपासून ६५ किमी वर असलेल्या पंतनगर येथील नीमकरौली बाबा आश्रम भारतातीलच नव्हे तर परदेशी भाविकांसाठीही अत्यंत पवित्र स्थान आहे. कदाचित आपल्याला कल्पना नसेल की याच आश्रमात येऊन अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनाही आयुष्याचा मार्ग सापडला होता.

नीम करौली बाबा हे संन्यासी हनुमानाचे अवतार समजले जातात.१९७३ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आश्रमाचा कारभार ट्रस्टतर्फे चालविला जात आहे. येथे भारताप्रमाणेच परदेशातूनही अनेक जण येतात आणि येथे साधना करतात. त्यात अमेरिकन लोकांची संख्या सर्वाधिक आहे. फेसबुकच्या मुख्यालयात टाऊन हॉलमध्ये मोदींच्या मुलाखतीदरम्यान मार्कने भारतातील एका मंदिराला भेट दिल्याचा आणि तेथे त्याला जीवनाचा मार्ग गवसल्याचा उल्लेख केला होता मात्र त्याचे नांव जाहीर केले नव्हते. मिडीया रिपोर्टनुसार हा आश्रम म्हणजे नीमकरोली बाबांचा आश्रम आहे. आश्रम परिसरात पाच मंदिरे असून त्यातील एक हनुमानाचे आहे.

आश्रमाचे ट्रस्टी सांगतात १९७४ साली अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज येथे आला होता. अध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात तो आला होता मात्र तेव्हा बाबांचे निधन झाले होते. तरीही तो महिनाभर येथे राहिला आणि अॅपलची मूहूर्तमेढ रोवून त्याने आयुष्यात प्रचंड यश मिळविले. त्याचा मार्ग त्याला सापडला. त्याचप्रमाणे झुकेरबर्गलाही फेसबुक विकायची की नाही असा पेच पडला होता तेव्हा तोही या आश्रमात एक दिवसासाठी आला होता. मात्र पाऊस खूप पडत असल्याने त्याला दोन दिवस येथे राहावे लागले. त्याकाळातच त्याचा फेसबुक न विकण्याचा निर्णय झाला आणि तो निर्णय किती बरोबर होता हे आज जगाला दिसते आहे. हॉलीवूडची अभिनेत्री जुलीया रॉबर्टस हिनेही या आश्रमात साधना केली आहे. बाबा आज नसले तरी त्यांचे मार्गदर्शन खर्‍या साधकांना अजूनही मिळते असा येथील अनुभव आहे असेही सांगितले जाते.

Leave a Comment