देशातील अन्य तीन शहरांमध्ये होणार बालाजी दर्शन

tirupati
हैद्राबाद – देशातील अन्य तीन शहरांमध्ये बालाजी मंदिर आणि बालाजी भवन उभा करण्याचा निर्णय जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशा तिरूमला तिरूपती देवस्थानमने घेतला आहे. संबंधीत राज्यातील भक्तांना श्री बालीजीचे दर्शन आता त्यांच्याच राज्यात करणे या निर्णयामुळे शक्य होणार आहे.

देशाच्या कानाकोपर्‍यातून तसेच विदेशातून भक्त तिरूपतीमध्ये श्री बालीजीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. याठिकाणी रोज ५० हजार भक्त दर्शनासाठी येतात. तर आठवड्‌याच्या अखेरीस आणि सुटीच्या काळात ही संख्या एक लाखावर पोहोचते. त्यामुळे बरेच वेळा गर्दीमुळे अनेकांना दर्शन घेता येत नाही. आता मात्र देवस्थानम समितीने देशातील काही शहरांमध्ये मंदिर उभारण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या त्या राज्यातील लोकांना त्यांच्याच राज्यात तिरपतीचे दर्शन होणार आहे. तसेच ज्या भक्तांना तिरूमला येथे जाणे शक्य होत नाही अशा स्थानिकांना याचा फायदा होऊ शकतो.

आंध्राची प्रस्तावित राजधानी अमरावती, छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये मंदिर बांधण्याचा निर्णय देवस्थानम समितीने घेतला आहे. याव्यतिरिक्त कुरूक्षेत्र, दिल्ली आणि कन्याकुमारी येथे मंदिर निर्मितीचे काम सुरू आहे. मंदिरासाठी छत्तीसगड आणि गुजरात सरकारने जमीन दान करण्याची तयारी दाखविली आहे. तर अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीम सरकार जागा देण्यासंदर्भात विचार करत आहे.

Leave a Comment