मुंबईत व्यावसायिक जागेचा १४८० कोटींना व्यवहार

godrej
मुंबईतील जुन्या राहत्या जागा विक्रमी किंमतीला नुकत्याच विकल्या गेल्यानंतर गोदरेज बीकेसी या व्यावसायिक इमारतीत एका मोठ्या जागेचा व्यवहार तब्बल १४८० कोटी रूपयांना झाला असल्याचे समजते. खरेदीदाराचे नांव घोषित केले गेलेले नाही मात्र अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अॅबट या औषधमिर्माण क्षेत्रातील कंपनीने ही जागा घेतली आहे.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स भागात हा आलिशान प्रकल्प गोदरेज प्रॉपर्टीज व जेट एअरवेज यांच्या संयुक्त सहकार्यातून उभारला जात आहे. विक्री करण्यात आलेल्या जागेसाठी १३ लाख रूपये चौरस फूट दर मिळाला आहे. गोदरेज बीकेसी नावाने सुरू असलेले हे बांधकाम २०१६ साली पूर्ण होणार आहे. २००६ साली अडीच एकराचा हा भूखंड जेट एअरवेजने ३९९ कोटी रूपयांत विकत घेतला होता. नंतर त्यांनी गोदरेज प्रॉपर्टीजशी भागीदारी करून तो त्यांना विकसित करण्यासाठी दिला. या प्रोजेक्टमधील अर्धा नफा जेट एअरवेजला मिळणार आहे.

या प्रोजेक्टमधील मोठा भाग जेट एअरवेजलाही दिला जाणार असून सुमारे १० लाख चौरसफूट जागा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे कंपनीचे सीईओ पिरोजशा गोदरेज यांनी सांगितले. विकली गेलेली जागा ४ लाख चौरस फूट असून बाकी जागेच्या विक्रीसंदर्भातही बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment