संरक्षणात स्वदेशी

ins-kochi
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारताला लागणार्‍या सरंक्षण सामग्रीपैकी ७० टक्के सामग्रींचे उत्पादन भारतात आणि स्वदेशी कंपन्यांतच करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. अशी सामुग्री आपण परदेशातून आयात करतो आणि त्यावर आपले अब्जावधी रुपये खर्च होतात. त्याऐवजी ही सामुग्री स्वदेशी तयार केली आणि त्या देशातल्या लहानमोठ्या उद्योगांना भागीदार करून घेतले तर देशात उत्पादन वाढवून रोजगार निर्मिती होईल आणि परदेशी चलनाची बचत होऊन अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होईल. असेही पर्रीकर यांनी सांगितले. भारत सरकारच्या अंदाजपत्रकातील २० टक्के रक्कम शस्त्रात्रांची आयात करण्यावर खर्च होते. ही शस्त्रास्त्रे आयात करण्याऐवजी देशात तयार केली तर किती मोठी बचत होईल याचा अंदाज या आकड्यावरून येतो.

भारतातल्या स्वदेशी आणि लघू आणि मध्यम उद्योगांना संरक्षण सामग्रीच्या निर्मितीच्या बाबतीत भागीदार करण्याचा सरकारचा विचार आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हे धोरण ठरवण्यात आले आहे. भारतातल्या कंपन्या अशी सामुग्री निर्माण करण्यास सक्षम आहेत. क्षेपणास्त्रांची स्वदेशी निर्मिती करून त्यांनी या सक्षमतेची ओळखही करून दिली आहे. तेव्हा संरक्षण साधनांच्या निर्मितीत भारतीय उद्योग कोठे कमी पडतील असे काही संभवत नाही. अर्थात संरक्षण उत्पादने हा तंत्रज्ञानाचा भाग असतो. त्यामुळे सगळीच तंत्रज्ञाने आपल्याला अवगत असतील असे नव्हे. जे तंत्रज्ञान आपल्याकडे नाही. त्याच्याशी निगडित उत्पादन हे तंत्रज्ञान बाळगणार्‍या देशाकडूनच करून घ्यावे लागणार आहे.

खर्चात बचत होण्याच्या दृष्टीने १०० टक्के संरक्षण सामुग्रीची निर्मिती भारतात करणे आवश्यक आहे परंतु तंत्रज्ञानामुळे ७० टक्क्यांपर्यंतच ती गोष्ट शक्य आहे. मात्र एवढ्यानेही अर्थव्यवस्थेवर मोठे चांगले परिणाम होणार आहेत. आपल्या देशातली परदेशी चलनातली गंगाजळी पेट्रोल, सोने आणि शस्त्रे अशा तीन गोष्टींवर प्रामुख्याने खर्ची पडते. त्यातल्या पेट्रोलवरचा भार थोडा कमी झाला आहे. सोन्यावरचा भार कमी व्हावा म्हणून सरकार काही उपाय योजत आहे. मात्र परकीय चलन गिळणारे तिसरे क्षेत्र म्हणजे सुरक्षा व्यवस्था ही अजून स्वावलंबी होत नाही. केंद्रातल्या मोदी सरकारने संरक्षण खात्यात स्वदेशीचा बाणा राबवण्याचे ठरवले आहे. या एका निर्णयातून १० ते १२ लाख रोजगार निर्मिती होईल आणि वट्ट राष्ट्रीय उत्पन्नात सरळ सरळ २ टक्क्यांची भर पडेल.

Leave a Comment