अखेर न्याय झाला पण…

blast
मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये प्रेशर कुकरमध्ये स्फोटके ठेवून अतिरेक्यांनी घडवलेल्या साखळी स्फोटांच्या प्रकरणात ५ जणांना फाशीची शिक्षा, ७ जणांना जन्मठेप आणि त्या सर्वांवर सव्वा कोटी रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली आहे. त्यावर आता समाधानाची प्रतिक्रिया उमटली आहे खरी पण या समाधानालासुध्दा एका खेदाची किनार आहे. शिक्षा झाल्या असल्या तरी त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हायला आणखी दहा वर्षे लागू शकतात. इतकी भारताची न्यायदान व्यवस्था दिरंगाईची आहे अशी एक खंत लोकांत व्यक्त होत असते. याच नव्हे तर कोणत्याही गाजलेल्या खटल्यात अशा शिक्षा जाहीर होतात तेव्हा दिरंगाईबद्दल चर्चा होतच असतात. अशी चर्चा वारंवार होऊनसुध्दा या दिरंगाईवर काही उपाय शोधण्यात आलेला नाही आणि दिरंगाईवर टीका करणार्‍यांनीही काही पर्यायी मार्ग सुचवलेला नाही. खटला म्हटल्यानंतर आरोपींना पकडावे लागेल, त्यांच्याकडून पुरावे हस्तगत करावे लागतीलच, ते पुरावे न्यायालयासमोर मांडावेच लागतील. याला काही पर्याय नाही आणि त्यातून विलंब अटळ आहे. असे तूर्तास तरी दिसते.

८ मिनिटांच्या कालावधीत मुंबईतल्या ७ रेल्वेगाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये १८८ लोक मारले गेले होते. तर ८०० पेक्षाही अधिक लोक जखमी झाले होते. अशा प्रकारणाचा तपास करणे मोठे अवघड असते. पण तरीसुध्दा साधारण ३ महिन्यांपर्यंत पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले आणि त्यांच्या आधारे तपास करत २००७ साली म्हणजे स्फोटानंतर वर्षभरात खटला उभा राहिला. या स्फोटामध्ये ज्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली त्यांना आज समाधान वाटत आहे. कारण अतीशय थंड डोक्याने या अतिरेक्यांनी आपल्या देशद्रोही कटाला साकार रुप दिले होते. या प्रकरणात प्रथमच प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला. याच घटनेच्या आसपास वाराणशीत झालेल्या एका स्फोटाध्ये असाच प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी तर काशी विश्‍वनाथाच्या मंदिर संकुलात एका लग्नाच्या वर्‍हाडात हे स्फोट झाले होते. या दोन घटनांनंतर प्रेशर कुकरचा असा कधी वापर झाला नाही. परंतु प्रेशर कुकरमध्ये ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट जोरदारपणे होऊ शकतो हे दिसून आले आहे. मुुंबईतल्या या स्फोटात प्रेशर कुकरमध्ये स्फोटके ठेवून ते सारे कुकर सात उपनगरी गाड्यांच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात ठेवण्यात आले होते. या प्रकरणात ज्यांच्यावर खटले भरण्यात आले ते १३ आरोपी भारतीय होते. हे सर्व आरोपी सिमी या देशद्रोही संघटनेचे आहेत.

त्यांना पाकिस्तानातील लैष्करे तय्यबा या संघटनेच्या घातपाती, कारस्थानी सदस्यांनी मदत केली आणि स्फोटानंतर हे सगळे पाकिस्तानी लोक पाकिस्तानात पळून गेले. याशिवाय भारतीय आरोपींपैकी दोघेही पाकिस्तानात पळून गेले आहेत. या १३ आरोपींना विशेष मोक्का न्यायालयात शिक्षा सुनावल्या गेल्या आहेत. परंतु या कटाचे पाकिस्तानातले मूळ सूत्रधार अजून कायद्यापासून दूर आहेत. ही अशाप्रकारच्या खटल्याची कमतरताच आहे असे म्हणावे लागेल. यावर काय उपाय योजावा हे सरकारने ठरवायचे आहे. मुंबईतले हे स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने शोध लावला ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र पाकिस्तानातले आरोपी भारतात येतात आणि अशा प्रकारची कारस्थाने करतात अशा कारवाया त्यांना करताच येऊ नयेत असा काहीतरी इलाज करण्याची गरज आहे. अर्थात त्यासाठी गुप्तचर यंत्रणा फार सावध असायला हव्यात आणि त्यांना सरकारकडून भरपूर सुविधा पुरवल्या जाव्यात. भारतात या गोष्टीची कमतरता आहे. मात्र भारतातली गुप्तचर यंत्रणा त्या कमतरतांवर मात करून शक्यतो चांगले काम करण्याचा प्रयत्न करत असतात.

या आरोपींना विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांच्यावर दोषारोप ठेवताना मोबाईल संवादावर मोठा भर देण्यात आलेला असल्याचे दिसत आहे. मात्र आरोपीच्या वकिलांना इथेच काहीतरी दिलासा मिळताना दिसत आहे. खालच्या न्यायालयातले खटले जेव्हा वरच्या न्यायालयात जातात तेव्हा तिथे अशा त्रुटींवर चर्चा होऊ शकते. त्याचा परिणाम म्हणून खालच्या कोर्टात फाशी झालेला आरोपी वर निर्दोषसुध्दा सुटू शकतो. काही खटल्यांमध्ये असे झालेले आहे. त्यामुळे फाशी सुनावलेल्या पाच आरोपींची फाशी सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकेलच याची शाश्‍वती नाही आणि जन्मठेपेची शिक्षा झालेले आरोपी निर्दोष सुटणे किंवा त्यांच्या शिक्षांमध्ये सूट मिळणे असेही काही घडण्याची संभावना नाकारता येत नाही. किंबहुना आरोपींच्या वकिलांना तसा विश्‍वासच वाटत आहे. हे सगळे होताना पुन्हा दिरंगाईचा मुद्दा येणारच आहे. घटना घडल्यानंतर ९ वर्षांनी विशेष न्यायालयात निकाल लागला. आता आरोपी उच्च न्यायालयात जातील तिथे चार-पाच वर्षे विलंब होईल. तिथून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि तिथेही पुन्हा चार-पाच वर्षे जातील आणि कायद्यांच्या कलमांचा तिथे किस पाडला जाईल. एवढ्यातूनही खालच्या सगळ्याच शिक्षा वरच्या न्यायालयात तशाच राहतील अशी काही शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा विशेष न्यायालयातील शिक्षा ऐकून आपल्याला झालेला आनंद क्षणभंगूर आहे.

Leave a Comment