हिमाचलमधील सर्वांग सुंदर कांगडा व्हॅली

kangra
पर्यटनाला जायचे तर प्रत्येकजण आपल्या पर्यटनाच्या आवडींप्रमाणे पर्यटनस्थळांची निवड करण्यास प्राधान्य देतात. मात्र धार्मिक, निसर्गसौंदर्य, साहसी क्रिडा प्रकार, ट्रेकिंग अशा कोणत्याही क्षेत्रातील पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी सहकुटुंब जाता येईल असे ठिकाण म्हणजे हिमाचलमधील कांगडा व्हॅली. अनेक प्राचीन मंदिरे, ट्रेकिगचे खूप पॉईंट, साईट सिईंगची अनेक ठिकाणे, पॅराग्लायडिंग, वॉटर स्पोर्टस, गड किल्ले आणि मन मोहविणारे निसर्गाचे रूप असे या कांगडा व्हॅलीचे प्लस पॉईंट आहेत.

कांगडा जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १० किमीवर असलेले धर्मशाळा हे तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचे आश्रयस्थान गॅक्लोडगंज नावाने प्रसिद्ध आहे. येथे परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. येथेच निर्वासित तिबेटी सरकारचे मुख्यालयही आहे. मिनी इस्त्रायल म्हणून ओळखले जाणारे धर्मकोट, भागसूनाग ही प्रेक्षणीय स्थळेही जवळच आहेत. ट्रेकींगसाठीचे लोकप्रिय त्रिथुंड म्हणजेत ट्रेकर्ससाठी दुसरा स्वर्गच आहे. हजारो पर्यटक येथे बहुतेक सर्व सिझनमध्ये ट्रेकींगसाठी येतात.

धार्मिक पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी येथे अनेक शक्तीपीठे आणि प्राचीन मंदिरे आहेत. मा चामुंडी, बजेश्वरी, मा ज्वालाजी अशी शक्तीपीठे व खूप प्राचीन असे बैजनाथ शिव मंदिर, भगवान कृष्ण व मीरा मंदिर, आशापुरी मंदिर, महाकाली माँ मंदिर, बगलमुखी मंदिर प्रेक्षणीय आहेतच त्याचबरोबर बौद्ध धर्माची दलाई टेंपल, नोरबुलींग, शेराबिलींग, खंपागर हे मठही पाहायलाच हवेत असे. किल्ला प्रेमींनी नुरपुर किल्ल्याला आवर्जून भेट द्यावी.

बैजनाथ येथे पॅराग्लायडिंगचे मोठे केंद्र असून येथे वर्ल्डकप स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. पौंग बांध येथे वॉटर स्पोर्टसचा आनंद लुटता येतो येथे अनेक परदेशी पक्षीही स्थलांतर करून येतात. भागसूनाथचा धबधबा तनमनाला शांती आणि उत्साह एकाचवेळी देण्याची किमया करतो. येथे जाण्यासाठी दिल्ली, पठाणकोट, चंदिगडहून थेट बससेवा आहे. रेल्वे मार्ग तसेच विमानानेही येथे जवळपासच्या परिसरापर्यंत जाता येते.

Leave a Comment