‘रेलयात्री’ अ‍ॅपवर तिकीट आरक्षणाची माहिती

rail-yatri
मुंबई – प्रवाशांचा अनेकवेळा दिवाळी असो किंवा गणेशोत्सव, अनेकदा प्रतीक्षा यादीतील तिकीट निश्चित न झाल्याने हिरमोड होत असल्यामुळे सुट्टीत बाहेर जाण्याचे संपूर्ण नियोजन बिघडते. जस-जशी प्रतीक्षा यादी कमी होत जाते तशी प्रवाशांची धाकधूकही अधिकच वाढते. मात्र ऐनवेळी तिकीट निश्चित न झाल्याने प्रवाशांची धावपळ होते. आता प्रवाशांची या धावपळीतून सुटका करण्यासाठी रेलयात्री हे नवीन अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्यामुळे तिकीट निश्चित होणार की नाही, हे समजणे सोपे जाणार आहे.

मागील काही दिवसांच्या तिकीट आरक्षणाच्या महत्त्वाच्या माहितीच्या आधारे हा अंदाज वर्तवला जाणार आहे. त्यासाठी गर्दीच्या वेळा, गर्दीचे दिवस, गाडीतील डब्यांचा वर्ग किंवा श्रेणी, चढण्या-उतरण्याची वर्दळीची स्थानके आणि ट्रेन या सर्व बाबींचा विचार केला जाणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाडय़ांची तिकिटे आरक्षित केल्यानंतर अनेकदा प्रतीक्षा यादीतील तिकिटे हाती लागतात. त्यामुळे प्रवासाच्या तारखेपर्यंत ही तिकिटे निश्चित होतील की नाही याबाबत अनिश्चितता कायम असते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत प्रवाशांच्या डोक्यावर टांगती तलवार असते. मात्र, आता रेलयात्री या अ‍ॅपमधून तिकिटांच्या प्रतीक्षा यादीचा अंदाज घेणे शक्य असल्याने प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असल्याचा दावा रेलयात्री अ‍ॅप समूहाकडून केला जात आहे.

दरम्यान, रेलयात्री हे अ‍ॅपने केलेला दावा हा ९५ टक्के खरा ठरतो, असा दावा रेलयात्रीचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक मनीष राठी यांनी केला आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या काळात रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणा-या प्रवाशांची डोकेदुखी यामुळे कमी होणार असून इतर पर्यायी वाहतुकीची चाचपणी करणे सोयीस्कर होणार आहे.

Leave a Comment