आता २०१७ मध्ये इस्रोची सूर्याच्या दिशेने झेप !

isro
मुंबई : चांद्रयान, मंगळयान आणि आता अ‍ॅस्ट्रोसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता इस्रोची पुढची झेप थेट सूर्याच्या दिशेने असणार आहे. आता वैज्ञानिक सूर्याकडे झेपावणार असून अ‍ॅस्ट्रोसॅट ही या प्रकल्पाची पहिली पायरी आहे, असेही म्हणता येईल. ‘चांद्रयान १’ च्या यशाआधीच भारताने सूर्याकडे झेपावण्याची कास धरली होती. आता इस्रोने ‘आदित्य-१’ मोहीम आखली आहे.

जानेवारी २००८ मध्ये भारतीय वैज्ञानिकांनी सूर्याकडे झेपावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. याची अधिकृत घोषणा तत्कालीन संचालक जी. माधवन नायर यांनी नोव्हेंबर २००८ मध्ये केली होती त्यामुळे इस्रोने सूर्याकडे झेपावण्यासाठी आदित्य -१ ची मोहीम आखली. या मोहिमेमध्ये सूर्याच्या शिरोभागाचा अभ्यास करण्यात येणार असून तेथे निर्माण होणा-या चुंबकीय क्षेत्राचाही अभ्यास करण्यात येणार आहे. याचा अभ्यास झाल्यास ता-यांच्या संदर्भातील अनेक अनुत्तरीत आणि अनाकलनीय प्रश्नांची उत्तरे मिळणे सोपे होणार आहे. सर्वांत आधी ही मोहीम २०१५-१६ मध्ये सुरू करण्याचा विचार होता. मात्र सूर्य किरणातून उपग्रहाचा बचाव हे या मोहिमेतील सर्वांत मोठे आव्हान आहे. त्याच बरोबर एवढ्या प्रकाशात अपेक्षित छायाचित्र टिपणारी दुर्बीण तयार करण्याचेही आव्हान भारतीय वैज्ञानिकांपुढे होते. म्हणून ही मोहीम २०१७-१८ मध्ये करण्याचे इस्रोने ठरविले असून या मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या उपकरणाचे प्रतिरूप तयार झाले असून काही टप्पेच बाकी आहेत याचा अभ्यास वैज्ञानिक करीत आहे. हे यान नियोजित वेळेत प्रक्षेपित होण्याची शक्यता खगोल वैज्ञानिकांकडून व्यक्त होत आहे. ‘आदित्य-१’ हे ४०० किलो वजनाचे आहे. त्यात विविध प्रकारच्या दुर्बिणी बसविण्यात येणार आहे तसेच या उपग्रहाला सूर्याच्या उष्णतेपासून वाचविण्यासाठी पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असलेल्या ‘एल-१’ या बिंदूवर ठेवला जाणार असून पृथ्वी आणि सूर्याची गुरूत्वाकर्षण शक्ती या उपग्रहाला रोखून ठेवण्यात यशस्वी होणार आहे.

Leave a Comment