हरित महामार्ग

highway
केन्द्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या भोवती झाडे लावण्याचा प्रचंड मोठा कार्यक्रम सुरू केला असून, या झाडांची जोपासना करण्यातून ५ लाख लोकांना रोजगार मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. ही योजना मोठी महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीची आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही गडकरी यांचीच कल्पना आहे. पण या रस्त्यांच्या बाजूनेसुध्दा अशा प्रकारची हिरवळ निर्माण करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. तसे झाल्यास शासकीय जागेचा चांगला वापरही होईल आणि देशातील झाडीचे प्रमाण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के होण्यास मदत होईल. नितीन गडकरी हे दूरदृष्टीचे नेते आहेत. म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरी हे आपले आवडते मंत्री असल्याचे म्हटले आहे.

आजवर आपल्या देेशातल्या मोठ मोठ्या कालव्यांचा वापर वाहतुकीसाठी करण्याची कल्पना कोेणी अंमलात आणली नव्हती. गडकरी यांनी जलमार्गे परिवहनाची कल्पना मांडली. ती ऐकल्यावर त्यांनी या योजनेचा किती सखोल विचार केला होता याचे दर्शन घडते. जलमार्गांचा वापर करण्याने रस्त्यांवरचा भार कमी होतो. पाण्यातून प्रवास आणि वाहतूक करताना पेट्रोल जाळावे लागत नाही. इंधन तेलावरचा आपला खर्चही कमी होतो आणि तेवढेच प्रदूषणही कमी होते. रस्त्यावरची वाहतूक कमी झाल्याने मार्गांवर कमी वाहने पळल्याचा परिणाम रस्ता वाहतुकीचा वेग वाढण्यावरही होईल.

देशातल्या महामार्गांची लांबी जगात सर्वात जास्त तर आहेच पण त्याच्या भवतालचा भाग तसा निरुपयोगीच असतो. त्यावर सौर ऊर्जेचे पॅनेल्स अंथरले तर तिथे वीजनिर्मितीही करता येते. घरांच्या छतावर असे पॅनेल ठेवून आपण सौर ऊर्जा निर्माण करू शकतोच पण या पॅनेल्सनी कालव्यांची जागाही व्यापता येते. कारण तशी ती वायाच जात असते. त्याचा आणखी एक फायदा होऊ शकतो. कालवा झाकल्याने पाण्याचेही बाष्पीभवनाने होणारे नुकसान टळते. नाही तर कालव्यातले ४० टक्के पाणी उन्हाने उडून जात असते. राष्ट्रीय महामार्गांच्या रिकाम्या जागेचा किती विधायक उपयोग करता येतो याचा विचार केला असता तर आणखीही काही उपाय सुचतात. महामार्गांवर पावसाचे पाणी पडते आणि ते वाहून जाते. त्या ऐवजी ते पाणी तिथेच जिरवण्याचा प्रयत्न केला तर ते जमिनीत मुरून तिथल्या जमिनीच्या पोटातला जलस्तर वाढू शकतो. एकंदरित जिथे सरकारची रिकामी जागा असेल तिथे झाडे, पाणी आणि ऊर्जा यांच्यासाठी त्या जागेचा वापर केला गेला पाहिजे.

Leave a Comment