मंगळावर ‘जीवन’ निश्चित; जीवांचे मात्र गूढच

mars
न्यूयॉर्क: मंगळाचे गूढ उकलण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘नासा’च्या संशोधकांना या ‘तप्त’ भासणाऱ्या ग्रहावर ‘शीतल’ पाण्याचे प्रवाह असल्याची खात्री पटली आहे. मात्र या ‘जीवन’ असणाऱ्या पाण्यापासून मंगळावर जीव अस्तित्वात होते किंवा आहेत; याचे कोणतेही पुरावे उपलब्ध न झाल्याने त्याबाबतचे गूढ मात्र कायम आहे.

मंगळ या पृथ्वीशी साधर्म्य असलेल्या ग्रहावर जीवसृष्टीच्या संशोधनाच्या दृष्टीने ‘नासा’ या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने हाती घेतलेल्या संशोधन प्रकल्पात उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळाचे गूढ उकलणार; असा दावा ‘नासा’च्या संशोधकांनी केला होता. त्यासाठी विशेष पत्रकार परिषद् आयोजित करण्यात आली. मात्र मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले असता जीवसृष्टीला कारणीभूत असलेल्या द्रव स्वरूपातील पाण्याचे या ग्रहावर अस्तित्व असल्याचे निश्चित झाले असले तरी प्रत्यक्ष जीवसृष्टी अस्तित्वात आहे किंवा या पूर्वी कधी होती याचे कोणतेही पुरावे संशोधकांना मिळालेले नाहीत. मात्र पाण्याचे अस्तित्व सिद्ध होणे हा या संशोधनाच्या यशाचा पहिला टप्पा असून जीवसृष्टीच्या शोधासाठी तो प्रेरणा देईल; असा विश्वास नासाच्या मंगळ मोहिमेतील ज्येष्ठ संशोधक मिशेल मेयर यांनी व्यक्त केला.

मंगळावर सापडलेल्या पाण्याची घनता अधिक असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. हे पानी प्रकाशातून उष्णता घेऊन कमी तापमानातही द्रव स्वरूपात राहू शकते आणि हे वाहते पाणी वातावरणातून असे एक विशिष्ट रसायन शोषू न घेते; की त्यामुळे वातावरणाचा थर विरळ असूनही उकळत नाही; अशी माहिती या प्रकल्पातील संशोधक कुझेन्द्र ओझा यांनी दिली. ओझा यांनाच ओरिझोना विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेताना मंगळावरील वाहत्या पाण्याच्या प्रवाहाचा शोध लागला होता. सध्याही ते पीएचडीसाठी संशोधन करीत आहेत.

मात्र मंगळावर हे पाणी आले कोठून याबाबतही संशोधकांना माहिती मिळालेली नाही. मंगळ ग्रहाच्या ध्रुवावर बर्फाच्या स्वरूपात गोठलेल्या पाण्याचे साठे आहेत; हे शास्त्रज्ञाना पूर्वीपासूनच माहिती आहे. मात्र ते वितळून त्याचे द्रवरूप पाणी होण्याची कोणतीही कारणे मंगळावरील हवामानात नाहीत; असे नासाचे वैज्ञानिक प्रकल्प समन्वयक जॉन ग्रन्स्फील्ड यांनी सांगितले.

मार्स क्युरीऑसिटी रोव्हरने मंगळावरील मिथेनचा शोध लावला असला तरी त्याला सजीवसृष्टीच्या कोणत्याही कहना सापडल्या नाहीत. मात्र पाण्याच्या शोधामुळे जीवसृष्टीची शक्यता मात्र वाढली आहे; असे मत संशोधिका मेरी बेथ विल्हेम यांनी नमूद केले. हे संशोधन पुढील आठवड्यात फ्रान्समध्ये युरोपियन प्लेनेटरी सायन्स कॉंग्रेसमध्ये मांडण्यात येणार आहे.

Leave a Comment