संगणकावर तासन्तास बसणाऱ्या महिलांना वजनवाढीचा धोका

fat
लंडन – अनेक महिलांना संगणकाचा तासन्तास वापर करणे आवडते. कार्यालयीन काम किंवा ई-मेलिंग, चॅटिंग, नेट सर्फिग किंवा संगणकीय खेळ खेळणे आदी कामे अनेक महिला करत असतात. पण संगणकावर अतिरिक्त प्रमाणात बसण्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावरही होऊ शकतो, अशी भीती ब्रिटिश शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

या शास्त्रज्ञांनी दररोज एक तास संगणकावर बसणाऱ्या महिलांचे वजन वाढू शकते, असे सांगितले. लंडनमधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने हे संशोधन केले. त्यासाठी त्यांनी २५०० तरुणांचा व त्यांच्या आरोग्याचा अभ्यास केला. यामध्ये काही महिलांचाही समावेश होता. बरेसचे तरुण आपला बराच वेळ संगणकासमोर काम करण्यात व्यतीत करत होते. त्याचा परिणाम त्यांच्या शरीराच्या चरबी वाढण्यावर होत असल्याचे दिसून आले. पुरुषांपेक्षा महिलांचे वजन संगणकावर वारंवार बसल्यामुळे वाढत असल्याचे या शास्त्रज्ञांना दिसून आले.

‘‘ज्या महिलांचे वजन सर्वसामान्य होते, पण ज्या दररोज एक तासापेक्षा अधिक वेळ संगणकावर व्यतीत करत होत्या, त्यांचे पाच वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढले. दररोज दोन तास संगणकासमोर बसणाऱ्या महिलांचे वजन चार ते पाच किलोने वाढल्याचेही लक्षात आले,’’ असे सारा थॉमी यांनी सांगितले. त्यातील काही महिला तर चक्क लठ्ठ दिसायला लागल्या, असेही थॉमी यांनी सांगितले.

महिलांच्या वजनवाढीचा अभ्यास करताना त्यांचे वय, व्यवसाय, संगणकावरचा दररोजचा वेळ, शारीरिक कार्य, झोप आणि सामाजिक परिस्थिती या गोष्टीही लक्षात घेतल्या गेल्या. संगणकावर अधिक वेळ बसल्याने महिलांचे वजन वाढते, पण आश्चर्य म्हणजे संगणकावर अधिक वेळ व्यतीत करणाऱ्या पुरुषांचे वजन मात्र वाढलेले दिसून येत नाही. शास्त्रांचा याबाबतचा अभ्यास सुरू आहे. महिला व पुरुषांमधील संप्रेरके वेगवेगळी असल्याने हे होत असावे, असा अंदाज थॉमी यांनी व्यक्त केला.