मिळणार डेबिटक्रेडिट कार्डद्वारे खरेदी आयकरात सूट

debit
नवी दिल्ली : प्लास्टिक नोटांच्या वापराला गती देण्यासाठी केंद्र सरकार डेबिट-क्रेडिट कार्डधारकांना एक नवी ऑफर देण्याची तयारी करीत असून, डेबिट आणि डेबिट कार्डच्या आधारे खरेदी केल्यास आयकरात सूट देण्याची ही ऑफर आहे. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ही ऑफर देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. कारण दिवाळीत मोठ्या प्रमाणात खरेदी होते. त्याचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो.

डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास आयकरात किमान २ टक्के सूट मिळू शकते. तशी तरतूद करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १०० रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी केल्यास ही सूट मिळू शकते. अर्थात, कार्डचा वापर केल्यास प्लास्टिक पैशांचा वापर अधिक प्रमाणात होईल. विशेष म्हणजे ही सूट केवळ खरेदीदारांनाच नाही, तर दुकानदारांनाही मिळणार आहे. मात्र, दुकानदारांना मिळणारी सूट फक्त १ टक्के असेल. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक निश्चित लक्ष्य पार करणे आवश्यक आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या वेळी यासंबंधीची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करून नगदी व्यवहाराचे प्रमाण कमी करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. परंतु आता खरेदीला सूट मिळाल्यास डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर अधिक प्रमाणात होऊ शकतो.

Leave a Comment