डायलेसिस सेंटरची संख्या वाढविणे गरजेचे

dailysis
मुंबई : अलिकडे वाढलेले धकाधकीचे जीवन आणि वाढता ताणतणाव यामुळे मधुमेहासारखे आजार होतात आणि त्यामुळे किडनीवर परिणाम होतो. यासाठी डायलेसिस हा आवश्यक उपचार ठरत आहे. त्यामुळे डायलेसिस सेंटरची संख्या वाढविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. याची गरज लक्षात घेऊन भविष्यात तसे नियोजन करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रबोधन संस्थेच्या वतीने मूत्रपिंड विकाराने त्रस्त रुग्णांसाठी गोरेगाव (पूर्व) येथील उमिया माता मंदिराशेजारी नवीन धर्मादाय डायलेसिस केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रबोधन संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी मिळाली आणि ही संस्था करत असलेली समाजपयोगी कामे मला जवळून पाहता आली. या संस्थेच्या वतीने रक्तपेढीही कार्यरत आहे. रुग्णाला शुद्ध रक्त मिळावे, यासाठी ही प्रणाली राबविली जावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, प्रबोधन ही संस्था १९७२ पासून विविध समाजपयोगी कामे करत आहे. क्रीडाभवन, जलतरण तलाव, जनरिक औषधांचा पुरवठा, रक्तपेढी या उपक्रमाबरोबरच डायलेसिसची सुविधा पुरविणारे अत्याधुनिक स्वरुपाचे केंद्र संस्थेच्या वतीने आज सुरु होत आहे. गोरेगाव उपनगरात प्रबोधन संस्था करीत असलेले कार्य निश्चितच अभिनंदनीय असल्याचे मत खासदार गजानन किर्तीकर यांनी यावेळी व्यक्त केले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही