सायबर हल्ल्यामध्ये तब्बल ५६ लाख जणांचे फिंगरप्रिन्ट्स चोरीला

cyber-attack
न्यूयॉर्क : आपले आर्थिक व्यवहार तंत्रज्ञानाच्या जोडीने अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात आपण असतो, पण एखादा सायबर हल्ला क्षणार्धात ही गुप्तता धोक्यात आणत असल्याच्या काही धक्कादायक घटनाही समोर येत असतात. तब्बल ५६ लाख जणांचे फिंगरप्रिन्ट्स अमेरिकेतील ऑफिस ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (ओपीएम)वर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये चोरीला गेले आहेत.

तब्बल २.१५ कोटी कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड्स अमेरिकन सरकारचे कार्यालय सांभाळणाऱ्या ओपीएमकडे आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचे नाव, पत्ते, आरोग्य आणि आर्थिक बाबींसोबत बोटांच्या ठशासारख्या बायोमेट्रिक माहितीचा समावेश आहे. सुरुवातीला हा आकडा एक लाखाच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र तपासात ही संख्या फार मोठी असल्याचे लक्षात आले आहे.

हॅक झालेल्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता सध्या मर्यादित असल्याचा दावा ओपीएमतर्फे करण्यात आला आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा धोका त्यांनी नाकारलेलाही नाही. याबाबत एक समिती अधिक तपास करत असल्याचेही ओपीएमतर्फे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. डाटा चोरीला गेलेल्या संबंधित यूझर्सना याबाबत लवकरच कळवण्यात येणार आहे.

Leave a Comment