दहा वर्षांत उघडणार ३२ हजार नवे पेट्रोल पंप

dharmendra-pradhan
नवी दिल्ली – सरकारची पेट्रोलियम कंपन्यांचे जाळे देशभर पसरविण्याची योजना असून, याचाच एक भाग म्हणून येत्या दहा वर्षांत देशात ३२ हजार नवे पेट्रोल पंप सुरू केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

मुंबईत नुकत्याच झालेल्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत प्रधान बोलत होते. संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी यावेळी उपस्थित होते. सध्या देशात ५३,८०० पेट्रोलपंप आहेत. मात्र, देशातील ग्राहकांची गरज भागविण्यात हे पेट्रोल पंप कमी पडत असल्यामुळे ग्रामीण भागात, तसेच राष्ट्रीय महामार्गावर येत्या दहा वर्षांत आणखी ३२ हजार पेट्रोलपंप सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

पेट्रोलियम कंपन्यांना बाजारभावाशी स्पर्धा करता यावी, तसेच ग्राहकांना बाजारातील या स्पर्धेचा फायदा व्हावा म्हणून ऑक्टोबर २०१४ मध्ये डिझेलच्या किंमती नियंत्रणमुक्त केल्या. त्यामुळे एस्सार, रिलायन्स आणि शेलसारख्या कंपन्यांना पेट्रोलियम बाजारात उतरता आले आणि त्यांनी देशात ३ हजारांवर रिटेल आऊटलेट सुरू केल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment