फॉक्सवॅगनच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा राजीनामा

volkswagen
न्यूयॉर्क: बोगस प्रदूषण चाचणी प्रकरणाची जबाबादारी स्वीकारून फॉक्सवॅगन या आघाडीच्या जर्मन कार उत्पादक कंपनीचे अध्यक्ष मार्टीन विंटरकॉम यांनी राजीनामा दिला आहे.

आपण नेहेमी कंपनीच्या हिताचा विचार केला असून एवढया मोठ्या प्रमाणात चुकीच्या गोष्टी घडत असल्याबद्दल अनभिज्ञ राहिल्याची अबाबदारी स्वीकारून कंपनीच्या हितासाठी आपण पदत्याग करीत असल्याचे त्यांनी संचालकाच्या तातडीच्या बैठकीत स्पष्ट केले.

कपंनीच्या ५० लाख डिझेल गाड्यांमध्ये अशी यंत्रणा बसविण्यात आली की प्रदूषण चाचणीच्या वेळी त्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणकारी वायूचे प्रमाण कमी दिसते. प्रत्यक्षात मात्र रस्त्यावर गाडी धावताना त्याच्या प्रदूषणाची पातळी अधिक असते. अमेरिकन नियंत्रकांनी केलेल्या तपासणीत कंपनीने केलेली ही फसवणूक उघडकीला आली.

या प्रकाराने आपल्याला धक्का बसला असून कंपनीला पुन्हा नवी सुरुवात करणे शक्य व्हावे यासाठी आपण मुख्य कार्यकारी पदावरून दूर होत आहोत. कंपनीची विश्वासार्हता पुन्हा प्राप्त करण्यासाठी झालेल्या चुकीचे स्पष्टीकरण आणि पुढील कारभारात पारदर्शकता आवश्यक आहे; असे विंटरकॉम म्हणाले.
विंटरकॉम हे ८ वर्षापासून फॉक्सवॅगनचे नेतृत्व करीत आहेत. ऑडी आणि पोर्शे हे जगभरातील नामांकित ब्रँडसही कंपनीच्या मालकीचे असून टोयोटाला मागे टाकून जगातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी बनण्याचे उद्दिष्ट वोक्सवॅगनने नुकतेच साध्य केले आहे.

Leave a Comment