केबल डिजीटायझेशनसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा

cable
पुणे – केबल सेवेच्या डिजीटायझेशन प्रक्रियेसंदर्भात राज्य सरकारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी पुण्यात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने ही कार्यशाळा घेण्यात आली. दिनांक ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत भारतातील सर्व शहरांमध्ये केबलद्वारे होणाऱ्या दूरचित्रवाणी प्रसारणाचे तिसऱ्या टप्प्यातील डिजीटायझेशन पूर्ण करायचे आहे; त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेला माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव आर. जया उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी डिजीटायझेशन प्रक्रीयेमागची भूमिका स्पष्ट केली. भारतात मनोरंजन क्षेत्रात वाहिन्यांचे प्रमाण मोठे असून सुमारे ८३० पेक्षा अधिक वाहिन्या भारतात आपले प्रसारण करतात. भारतामध्ये दुरचित्रवाणीवर सर्वात अधिक केबल सेवेद्वारा प्रसारण होते. ही सेवा पुरवणाऱ्या ऑपरेटर्सची संख्या ६० हजाराहून अधिक आहे व या सेवेचे नियंत्रणही त्यांच्याच हातात आहे. कोणत्या वाहिन्या पहायच्या, कोणत्या वाहिन्यांचे पैसे भरायचे, याचे नियंत्रण प्रेक्षक म्हणून केबल ग्राहकाच्या हाती असावे यासाठी हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी सरकारतर्फे हाती घेण्यात आला होता. याचे दोन टप्पे २०१३ मध्ये पूर्ण झाले आहेत. पहिल्या टप्प्यात देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई व कोलकाता या चार महानगरात डिजीटायझेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली; तर दुसऱ्या टप्प्यात देशातील १० लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ३८ महानगरात ही प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील ९ शहरांचा समावेश होता. आता ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत देशातील उर्वरित सर्व शहरांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत देशातील उर्वरित सर्व क्षेत्रात ही प्रक्रिया पूर्ण होईल.

डिजीटायझेशनमुळे होणारे काही फायदेही आर. जया यांनी याप्रसंगी सांगितले. डिजीटायझेशनमुळे महसूलात कमीतकमी ४०% वाढ झाल्याचे दिसून आले. याशिवाय आर्थिक क्षमतेसोबत रोजगार संधी वाढली. डिजीटायझेशनमुळे सेवा क्षेत्रातील रोजगारात वाढ झाली आहे. तसेच सध्या अल्प प्रमाणात सुरु असलेली सेवा म्हणजे केबलद्वारे ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देणे; लवकरच यामाध्यमातून इंटरनेट घराघरात पोहचेल व याचे प्रमाण वाढेल. केंद्र/राज्य सरकार/प्रशासनाने सुरु केलेल्या व भविष्यात सुरु होणाऱ्या ई-सेवांचा लाभ यामुळे नागरिक घेऊ शकतील.

यासर्व बाबींमुळे डिजीटायझेशन गरजेचे बनले आहे. याशिवाय देशात केबलद्वारे सेवा घेणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक असल्याने आपोआपच डिजीटायझेशनला महत्व प्राप्त होत आहे.

Leave a Comment