न्यूयॉर्क : गुगल आपल्या यूझर्ससाठी पाठवलेला ईमेलरुपी बाण आऊटबॉक्सरुपी भात्यात परत आणण्यासाठी सुरु केलेल्या ‘अनडू’ सेवेनंतर नवी भेट घेऊन आले आहे. आता नको असलेल्या व्यक्तींचे ईमेल जीमेल यूझर्स ब्लॉक करु शकतील, तसेच न्यूजलेटर्स अनसब्स्क्राईबही करु शकणार.
गुगलची नवी सुविधा; आता नको असलेले ईमेल करा ब्लॉक
एखादा विशिष्ट ईमेल आयडी जीमेल यूझर्सना ब्लॉक करता येईल अशी माहिती गुगलतर्फे एका ब्लॉगपोस्टवर देण्यात आली आहे. अँड्रॉईड यूझर्सना या सुविधेचा लाभ पुढच्या आठवड्यापासून घेता येईल. ब्लॉक केलेले मेल थेट स्पॅम बॉक्समध्ये जातील.
दुसरीकडे आपण असंख्य न्यूजलेटर्स सब्स्क्राईब करतो, मात्र कालांतराने त्यातील रस संपल्यावरही त्यांचे ईमेल्स आपल्या इनबॉक्समध्ये येऊन धडकत असतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी असे न्यूजलेटर्स अनसब्स्क्राईब करण्याचा पर्यायही जीमेलतर्फे देण्यात येणार आहे. जगभरात ९० कोटीहून जास्त जीमेलचे यूझर्स आहेत. नेटिझन्समध्ये जीमेल ही सर्वात लोकप्रिय ईमेल सर्व्हिस आहे.