डॉ. कॉ. पानसरे यांच्या खुनाचा छडाच लागत नव्हता आणि त्यावरून राज्यातल्या बहुसंख्य पुरोगामी चळवळीतल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या भाजपा-सेना युतीच्या सरकारलाा लक्ष्य केले होते. मात्र आता गुन्ह्याच्या तपासाच्या शास्त्रात खूप प्रगती झाली आहे. न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) चांगलेच विकसित झाले आहे. एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आर्थिक व्यवहारातील तज्ञांची गरज असते. तर कधी मानसशास्त्रज्ञाची आवश्यकता असते. कधी गुन्हे शास्त्रातील तज्ञाला पाचारण करावे लागते तर कधी दळणवळण क्षेत्रातील तज्ञाची गरज भासते. त्यामुळे न्यायवैद्यकशास्त्राच्या जवळपास १९ शाखा विकसित झाल्या आहेत आणि त्या त्या शाखेतले तज्ञ गुन्ह्याच्या तपासामध्ये चांगले काम करायला लागले आहेत. मोबाईल फोनवरून झालेले संभाषण हा गुन्ह्याचा माग काढण्याचा एक खात्रीचा मार्ग आता विकसित झाला आहे. अलीकडच्या काळात तपास लागलेल्या काही गुन्ह्यांमध्ये अशा संभाषणांवरूनच पोलीस काही निष्कर्षाप्रत आलेले दिसत आहेत.
खालच्या दर्जाचे राजकारण
कॉ. पानसरे यांच्या खुनाचा तपास फार अवघड होता आणि न्यायवैद्यकशास्त्राच्या या शाखा विकसित झाल्या नसत्या तर हा तपास लागणे अवघड होते. परंतु केवळ मोबाईलच्या संभाषणावरून पोलिसांनी संशयितापर्यंत आपले हात योग्यरित्या पोहोचवले आहेत. त्यातूनच समीर गायकवाड याचा शोध लागला आणि आत कॉ. पानसरे यांच्या खुनाचे धागेदोरे उकलले जाताना दिसत आहेत. खरे तर याविषयी पोलिसांना शाबासकीच दिली पाहिजे. परंतु महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने पोलिसांनाच लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्राचे पोलीस हिंदुत्ववादी संघटनांचा सूड घेण्यासाठी सनातन संघटनेच्या कार्यकर्त्यांना गुन्ह्यात जाणीवपूर्वक गोवत आहेत. असा आरोप शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून म्हणजे सामनामधून केला आहे. एखाद्या इतक्या नाजूक प्रकरणात पोलीस असे निरपराध व्यक्तीला आणि एका संघटनेच्या कार्यकर्त्याला विनाकारण गोवतील अशी शक्यता नाही. परंतु शिवसेनेचे मुखपत्र आपल्याच सरकारवर तसा आरोप करत आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये एखाद्या आरोपीला अटक झाली की ही संघटना असा आरोप करतच असते. तशीच भूमिका सनातन संघटनेनेही घेतली आहे. आपले कार्यकर्ते निर्दोष आहेत, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना खुनाच्या आरोपात अटक झाल्यास त्यांची बदनामी होते त्यामुळे त्यांनी असे आकांडतांडव करणे साहजिक आहे. परंतु शिवसेनेने सनातन संघटनेची पाठराखण का करावी हे कळायला काही मार्ग नाही.
पोलिसांनी समीर गायकवाडला कशी अटक केली, याचे तपशील दिले आहेत. फोनवरच कोणते संभाषण त्याला अटक करण्यास उपयुक्त ठरले याचेही स्पष्टीकरण दिलेले आहे. वास्तविक पाहता पोलिसांनी असे खुलासे करण्याची काही गरज नाही. पण तरीही पोलीस सारे तपशील सांगत आहेत आणि शिवसेना मात्र पोलिसांवर ताशेरे झाडत आहे. हे ताशेरे झाडतानासुध्दा शिवसेनेने कसलेही खुलासे केलेले नाहीत. तरीही सूडभावनेचा आरोप सुरूच आहे. समीर गायकवाडचे पकडलेले संभाषण खोटे आहे, त्याने दोघांचा काटा काढला आहे आणि आता तिसर्याचा काढायचा आहे असे उद्गार काढले हे पोलिसांचे म्हणणे चुकीचे कसे आहे याचा कसलाही खुलासा सामनामधून झालेला नाही. केवळ हिंदुत्ववादी संघटनेचा कायकर्ता पकडला गेला एवढ्याच एका गोष्टीवरून हे हिंदुत्ववादाच्या विरोधातले कारस्थान आहे असा उथळ युक्तिवाद शिवसेनेच्या मुखपत्रात केलेला आहे.
हिंदुत्ववादाचा राजकीय वापर करण्याची ही शिवसेनेची युक्ती तिचा हिंदुत्ववाद कसा वरवरचा आहे हे दाखवून जाते. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कसला गुन्हा केला त्याला अटक करू नये असे काही शिवसेनेचे म्हणणे आहे का? पोलिसांनी दीड लाख संभाषणांची छाननी केली आहे. त्यासाठी ते गेल्या वर्षभरापासून झटत आहेत पण शिवसेनेचे मुखपत्र या सगळ्या प्रयत्नांची वासलात केवळ एका वाक्यात लावून टाकत आहे. हा खालच्या दर्जाच्या राजकारणाचा प्रकार आहे. शिवसेना सध्या सत्तेत असली तरी जणू आपण सत्तेत नाहीच, असे दाखवायचा प्रयत्न करत असते. विरोधी पक्षापेक्षाही अधिक कडवटपणे आपल्याच सरकारवर टीका करत असते. भारतीय जनता पार्टी हा सत्तेतला मोठा पक्ष असल्यामुळे सरकारवरची टीका ही नकळतपणे भाजपावरची टीका ठरते आणि अशा टीकेतून शिवसेना भाजपाला खिजवण्याची संधी साधत असते. सत्तेत भाजपा आहे पण हिंदुत्ववादी संघटनेच्याच कार्यकर्त्यांना सूड भावनेने अटक होते याचा अर्थ भाजपाचा हिंदुत्ववाद पोकळ आहे असे शिवसेनेला यातून सूचित करायचे आहे आणि एकदा असे सूचित झाले की आपणच खरे हिंदुत्ववादी आहोत हे नकळतपणे लोकांच्या मनावर ठसते असाही बालिश आशावाद शिवसेनेला वाटत असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे हे अशाच पध्दतीने आपण शिवसेनेपेक्षा अधिक मराठीवादी आहोत हे स्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. तसाच प्रयोग शिवसेनेचे नेत भाजपाच्याबाबतीत करत असतात.