एशियन महामार्गाने थेट चीन जपानला चला

asian-highway
राज्य महामार्ग, राष्ट्रीीय महामार्ग हे आपल्या नित्याच्या परिचयाचे असतात. त्याचाच पुढचा भाग म्हणजे आता एशियन महामार्गांचा विस्तार वेगाने होऊ लागला असून यामुळे बहुतेक सर्व आशियाई देशांत रस्तामार्गाने जाणे शक्य होत आहे. भारत, म्यानमार आणि थायलंडला जोडणारा एशियन महामार्ग नुकताच सुरू झाला असून हे महामार्ग रोमांचकारी प्रवासाचा आनंद प्रवाशांना देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

एशियन हायवे नंबर ४२ हा झारखंडपासून सुरू होतो आणि नेपाळच्या त्रिभुवन हायवेपर्यंत या महामार्गावरून केवळ १० तासात पोहोचता येते. हाच मार्ग पुढे चीनपर्यंत जातो. त्यासाठी मात्र तीन दिवसांचा प्रवास करावा लागतो. गुगल मॅपसारखी सुविधा हाताशी असेल तर या एशियन महामार्गांवरचा प्रवास आणखी सोपा होतो. एशियन हायवे ४३ थेट श्रीलंकेत नेतो. या हायवेमुळे कोलकाता बंगलोर जोडले गेले आहे.

एशियन हायवे ४३ हा अनेक राष्ट्रीय महामार्गांना जोडतो. याच मार्गाने इंडोनेशिया जोडण्याचे काम सुरू झाले आहे. हा मार्ग २०३० पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले जात आहे. हायवे नंबर ४६ हा १९६७ किमीचा महामार्ग पाच राज्यातून जातो. प.बंगाल, झारखंड, ओरिसा, छत्तीसगढ आणि महाराष्ट्र ही राज्ये या एशियन महामार्गामुळे जोडली गेली आहेत. एशियन हायवे ४७ हा २०५७ किमीचा असून ग्वाल्हेर, धुळे, ठाणे, मुंबई, बंगलोर यामुळे जोडले गेले आहे.

एशियन हायवे ४८ हा सार्क रोड म्हणूनही ओळखला जातो. सार्क देशांच्या आपसातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत सरकारने या हायवेला मान्यता दिली आहे आणि त्याचे काम सुरू झाले आहे. भूतान, बांग्ला सीमा या हायवेवर येते. एशियन हायवे १ हा सर्वाधिक लांबीचा असून त्याने अनेक प्रदेश आणि देश जोडले गेले आहेत. हा जपानच्या टोकियोपासून सुरू होतो आणि हाँगकाँग, चीन, बांग्लादेश, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान थायलंड इतके देश जोडतो. हा महामार्ग २०१६ साली पूर्णतः कार्यान्वित होणार आहे.

Leave a Comment