आयकर विभाग करदात्यांना ‘ई-मेल’नोटीस पाठविणार

income-tax
नवी दिल्ली – आयकर खाते लवकरच आपल्या सर्व करदात्यांना चक्क ‘ई-मेल’ने नोटीस पाठविण्याची नवी पद्धत सुरू करणार आहे. ‘ई-मेल’ने नोटीस मिळाल्यानंतर करदात्यांनाही आपले उत्तर याच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करायचे असल्यामुळे आयकर अधिकार्‍यांकडून होणार्‍या त्रासापासून करदात्यांना मुक्ती मिळणार आहे.

याबाबतचा निर्णय आयकर खात्याकरिता धोरण तयार करणारे सर्वोच्च मंडळ असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ही नवीन पद्धत अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेली रूपरेषा तयार करण्यात येत असल्याची माहिती सीबीडीटीच्या अध्यक्ष अनिता कपूर यांनी वृत्तसंस्थेच्या एका मुलाखतीत दिली.

मध्यम किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त कररचनेत येणार्‍या करदात्यांचे आयुष्य आणगी सुखकर कसे करायचे, यावर आम्ही गंभीरपणे विचार करीत आहोत. यातूनच ‘ई-मेल’ने नोटीस पाठविण्याची कल्पना समोर आली आहे. करदात्याला आमच्या खात्याकडून अशा प्रकारची नोटीस मिळाल्यानंतर त्याच्या उत्तरासाठी त्यांना कार्यालयात येण्याची गरज नाही. आपले उत्तरही ते ‘ई-मेल’नेच पाठवू शकणार आहेत. सध्या काही सुरक्षा मुद्यांवर आम्ही चर्चा करीत आहोत. त्यानंतर ही योजना अंमलात आणण्याच्या दिशेने पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment