आईचे पत्र

letter
ऑस्ट्रेलियातल्या एका महिलेने १३ वर्षे वयाच्या आपल्या मुलाला एक पत्र लिहिले आहे आणि ते पत्र आता व्हायरल झाले आहे. आता कोणती गोष्ट व्हायरल होणे हे सोपे झालेले आहे. त्यामुळे एरवी असे एखादे पत्र त्या दोघांपुरतेच मर्यादित राहिले असते ते जगासमोर आले. विषय सार्वत्रिक असल्यामुळे पत्रावर प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. त्यांचेही प्रमाण चांगलेच आहे. या आईने आपल्या मुलाला स्वावलंबनाचा धडा देणारे पत्र लिहिले आहे. कारण १३ वर्षे वयाचा मुलगा अस्मिता जागी झाल्यामुळे घरात स्वातंत्र्याची मागणी करायला लागला होता. त्याच्या आईने त्याला स्वातंत्र्य देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र त्याचबरोबर त्याला कर्तव्याची जाणीव देणारे पत्र लिहिले आहे. स्वातंत्र्य हवे असेल तर त्याने घरातल्या काही कामांची जबाबदारीसुध्दा घेतली पाहिजे. असे या आईने आपल्या मुलाला बजावले आहे.

हे पत्र व्हायरल होणे आणि त्यावर एवढ्या प्रतिक्रिया उमटणे ही गोष्ट स्वाभाविक वाटावी इतका हा प्रश्‍न प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा झालेला आहे. घराघरातून मुले स्वातंत्र्य मागायला लागली आहेत आणि या स्वातंत्र्याच्या मागणीने पालकांची पिढी अस्वस्थ झाली आहे. कारण त्यांना स्वतःला असे स्वातंत्र्य मिळालेलेही नव्हते आणि त्यांनी तसे मागितलेलेही नव्हते. मात्र आता बाल मानसशास्त्राने प्रत्येक लहान मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते हा विचार फार दृढ केलेला आहे. त्यामुळे लहान मुलांना मारू नये, त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात, त्याला मनाप्रमाणे वागू द्यावे इत्यादी कल्पना आता घराघरापर्यंत पोहोचल्या आहेत. असे असले तरी स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून दिले पाहिजे ते स्वातंत्र्य एका बाजूला आहे तर मुलांवर संस्कार केले पाहिजेत ही अपेक्षा दुसर्‍या बाजूला आहे.

त्यामुळेच मुलांशी नेमके कसे वागावे हे पालकांना समजेनासे झाले आहे. फार स्वातंत्र्य द्यावे तर मुले बिघडण्याची भीती वाटते आणि आपले संस्कार त्यांच्यावर लादायला गेलो की त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधन आणल्यासारखे होते. यातून कसा मार्ग काढावा, या कल्पनेने त्रस्त झालेल्या पालकांची ही ऑस्ट्रेलियन महिला प्रतिनिधी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मुलांचे अवास्तव स्वातंत्र्य मान्य केलेले नसते. त्यामुळे स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला भेद ओळखून मुलांना स्वातंत्र्य देतानाच त्याबाबतचे तारतम्यही पाळणे आवश्यक आहे. त्यांना स्वावलंबनाचे धडे आणि जबाबदारीची जाणीव देऊनच स्वातंत्र्य दिले पाहिजे.

Leave a Comment