इतिहासकारांचा नव्या अभ्यासात दावा; १० जानेवारी ५११४ रोजीचा श्रीरामाचा जन्म

prabhu
नवी दिल्ली – प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिन म्हणून आपण आतापर्यंत चैत्र शुद्ध नवमी अर्थात चैत्र नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस उत्साहात साजरा करीत आलो आहोत. पण, इतिहासकारांनी आपल्या ताज्या अभ्यासात श्रीरामचंद्रांचा जन्म इ. स. पूर्व १० जानेवारी ५११४ रोजी दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी झाला असल्याचा दावा केला आहे.

‘इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफीक रिसर्च ऑन वेदाज’ या संस्थेने हा अभ्यास केला आहे. या संस्थेच्या मते, महाभारतातील महासंहारक युद्ध इ. स. पूर्व १३ ऑक्टोबर ३१३९ रोजी लढले गेले होते आणि रामभक्त हनुमानाने इ. स. पूर्व १२ सप्टेंबर ५०७६ रोजी माता सीतेची अशोक वाटिकेत भेट घेतली होती. या संस्थेने राजधानी दिल्लीतील ललित कला अकादमीत एका प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा उपस्थित होते.

याबाबत बोलताना महेश शर्मा म्हणाले की, या प्रदर्शनात मी सुमारे दीड तास घालवला आहे. बारकाईने लक्ष द्यावे, असे यात बरेच काही आहे. यात जी माहिती आहे, त्यावर आपले मंत्रालय लवकरच अहवाल मागविणार आहे. महाभारत आणि रामायणाच्या नेमक्या अस्तित्वाबाबत आतापर्यंत अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. या प्रदर्शनात जी माहिती आहे. ती केवळ वैज्ञानिक आधारावर आहे.

संस्थेच्या संचालक सरोज बाला यांच्या मते, रामायण आणि महाभारतातील घटनांची नेमकी तारीख माहीत करण्यासाठी आम्ही सखोल अभ्यास तर केलाच, शिवाय अमेरिकेतील अत्याधुनिक सॉफ्टवेअरचाही आधार घेतला. ऋग्वेद, रामायण आणि महाभारत काळातील ग्रहदशांची माहिती प्राप्त करून आम्ही या तारखा काढल्या आहेत. भगवान श्रीरामांचा जन्म ज्यावेळी झाला, त्यावेळी ग्रहाची दशा कशी होती, याची माहिती ग्रंथांमध्ये आहे. या माहितीला आम्ही सॉफ्टवेअरमध्ये टाकले असता, श्रीरामाच्या जन्माची तारीख आणि वेळ आम्हाला प्राप्त झाली. या सॉफ्टवेअरमुळे महाभारतातील युद्ध, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्माची तारीख व वेळ काढण्यात आम्हाला यश आले आहे. आम्ही जी माहिती काढली, ती मिथ्या नसून, सत्यता आहे, असा दावाही त्यांनी केला.

Leave a Comment