लंडन: आपल्या भविष्याविषयी प्रत्येकालाच चिंता असते असे नाही. मात्र त्याबद्दल कुतूहल प्रत्येकालाच असते. हे कुतूहल शमविणारे नैव मोबाईल ऍप मोबाईलधारकांच्या सेवेत रुजू झाले आहे. आपल्या भविष्याचे कथन करणारे गूगल फॉर्च्यून टेलिंग ऍप ज्यांना आपले भविष्य माहितच नाही; अशा लाखो निर्वासितांच्या प्रश्नाबाबत जागृती निर्माण करण्याचे कामही करणार आहे.
भविष्यकथन करणारे गूगल फॉर्च्यूनटेलर ऍप
या ऍपच्या नावात गूगल असले तरी प्रत्यक्षात गूगल कंपनीशी त्याचा कोणताही संबंध नाही. नेदरलॅंड येथील ब्रेन मीडिया ही कंपनी या ऍपचे व्यवस्थापन करीत आहे. त्यांची बेटागूगल डॉट कॉम ही वेबसाइटही आहे.
या ऍपच्या माध्यमातून आपले दैनंदिन भविष्य जाणून घेता येणार आहे. आपल्या भविष्यविषयक शंका आणि प्रश्न यांना उत्तरे मिळण्याची सुविधाही या ऍपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
युद्धजन्य परिस्थिती आणि दहशतवादी कारवाया यामुळे देशोधडीला लागलेल्या कोट्यावधी निर्वासितांचा प्रश्न जगासमोर आ वासून उभा आहे. या प्रश्नाबाबत जाणीव जागृती करण्याचे कार्यही या ऍप आणि वेबसाईटच्या माध्यमातून केले जाणार आहे. या साईटद्वारे निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी देणगी देता येणार आहे. ही देणगीची रक्कम युनायटेड नेशन्स रिफ्यूजी एजन्सीकडे जमा होणार आहे. सीरिया, अफगाणिस्तान, येमेन, ईराक, लीबिया या देशातील हिंसक कारवायांमुळे कोट्यावधी नागरीक आपले भवितव्य टांगणीला लाऊन इतर देशात स्थलांतर करीत आहेत.