मध्य प्रदेशात आहेत डायनासोरच्या गुफा; संशोधकांचा दावा

dinasoure
इंदूर : डायनोसरच्या दोन अतिशय प्राचीन गुफा मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात संशोधकांना आढळून आल्या असून, या गुहांमध्ये डायनासोरची अंडीही सापडल्या आहेत. ही अंडी ६.५ कोटी वर्षांपूर्वींची असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

या दोन नव्या गुफा आम्हाला इंदूरपासून अवघ्या १२५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धारजवळील एका जंगलात आढळून आल्या. ६.५ कोटी वर्षांपूर्वी जी भौगोलिक उलथापालथ झाली होती, त्यात महाकाय दगडांखाली या गुफा गाडल्या गेल्या असाव्यात, अशी माहिती मंगल पंचायत परिषदेचे प्रमुख आणि प्रख्यात भूगर्भतज्ज्ञ विशाल वर्मा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

धार जिल्ह्यातील बागा परिसरात सापडलेल्या दोन्ही गुफा परस्परांपासून आठ किलोमीटर अंतरावर आहेत. प्रत्येक गुफेत डायनासोरची किमान १५ अंडी असावीत. तथापि, दोन्ही गुफांमध्ये नेमकी किती अंडी आहेत, याचा शोध संशोधकांकडून घेतला जात आहे, असे त्यांनी सांगितले.या अंड्यांच्या आणि गुफेतील रचनेचा सखोल अभ्यास केल्यानंतर डायनासोरची अंडी देण्याची पद्धत कशी होती, याचा शोध लागू शकणार आहे. सोबतच, अंडी देण्यासाठी डायनासोर एकाच जागेचा वारंवार वापर करीत होते का, हेदेखील या अभ्यासातून स्पष्ट होणार आहे, असे ते म्हणाले. गेल्या एक दशकापासून माझी चमू या भागात संशोधनकार्य करीत आहे. यापूर्वीही आम्हाला डायनासोरच्या दोन गुफा सापडल्या होत्या. त्यात आता दोन नव्या गुफांची भर पडल्याने शोध लागलेल्या एकूण गुफांची संख्या चार झाली आहे. या महाकाय प्राण्याच्या सौरोपोड जातीशी संबंधित ही अंडी असावी, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. कोट्यवधी वर्षांपूर्वी मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात डायनासोरचे अस्तित्व होते. हा सुमारे १०८ हेक्टरचा परिसर असून, तो संपूर्ण परिसर विकसित करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने ठोस धोरण तयार केले आहे.

Leave a Comment