डायनासॉरच्या नव्या प्रजातीचे अवशेष सापडले

Ava
कोलोरॅडो: जाड शेपूट असलेल्या, मोठ्या डोक्याच्या आणि शिंग असलेल्या डायनासॉरच्या नव्या प्रजातीचे अवशेष कोलोरॅडो येथील संशोधक माईक ट्रायबोल्ड आणि त्यांच्या पथकाने शोधून काढले आहेत. या प्रजातीचे शास्त्रीय नामकरण अद्याप झाले नसले तरी ट्रायबोल्ड यांच्या पथकाने त्याचे ‘अवा’ असे टोपणनाव ठेवले आहे. हे अवशेष ९० लाख वर्षापूर्वीचे असल्याचा दावा ट्रायबोल्ड यांनी केला.
सन २०१२ पासून हे अवशेष मोन्टाना परिसरात सापडण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला संशोधकांच्या पथकाला हे अवशेष सध्या माहीत असलेल्या ‘अवासारटॉपस’ या प्रजातीची असल्याचे वाटले. मात्र अधिक अवशेष सापडल्यानंतर ही अद्याप ज्ञात नसलेली नवी प्रजाती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या डायनासॉरच्या सांगाड्याचे ८५ टक्के अवशेष ट्रायबोल्ड यांना सापडले आहेत.
हा सांगाडा कमी वयाच्या डायानासॉरचा असून तो ११.५ फूट लांब आणि ४.२५ फूट उंच आहे. या डायानासॉरला डोक्यावर दोन आणि नाकावर एक असे शिंग आहे.