ईपीएफओचे मोबाईल अ‍ॅप; मिस्ड कॉलवर मिळणार पीएफची माहिती

epfo
नवी दिल्ली : पीएफ, निवृत्तीवेतनधारकांसाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफ अकाऊंटची माहिती मिळविण्याकरिता खास मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. तसेच मोबाईलवर आधारित सेवाही सुरू केली आहे. या सेवा तीन प्रकारच्या असून, मिस्ड कॉल करताच आता पीएफ आणि पेन्शनची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

मोबाईल अ‍ॅप्लिकेशन, एसएमएस आधारित युनिव्हर्सल अकाउंट नंबर अ‍ॅक्टिवेशन आणि मिस्ड कॉल सेवा देणारे आहे. या माध्यमातून पीएफधारकांना आपल्या पीएफची माहिती मिळविता येणार आहे. ईपीएफओच्या वेबसाईटवरून नवे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर पीएफधारक आपल्या मोबाईल फोनवरून यूएएन खाते सक्रीय करू शकतो आणि या माध्यमातून तो दरमहा आपल्या खात्यात जमा होणारी रक्कम किंवा अन्य तपशील मिळवू शकतो. या मोबाईल अ‍ॅपचा यासाठी फायदा होणार आहे. याबरोबरच एसएमएस आधारित यूएएन अ‍ॅक्टिव्हेशनच्या माध्यमातूनही एसएमएस मिळविता येणार आहे. जी मंडळी कॉम्प्यूटर किंवा स्मार्ट फोनपासून दूर आहेत, अशा लोकांसाठी ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सेवेसाठी ७७३८२९९८९९ या क्रमांकावर आपला यूएएन क्रमांक एसएमएस करावा लागेल. त्यानंतर ही सेवा सुरू होईल. याशिवाय पीएफधारकांसाठी मिस्ड कॉल सेवाही सुरू करण्यात आली असून, या सेवेअंतर्गत जर आपल्या पीएफ खात्याचे बॅलेन्स जाणून घ्यायचे असेल, तर ०११२२९०१४०६ या क्रमांकावर मिस कॉल करू शकता. मिस्ड कॉलनंतर लगेचच एसएमएस येईल. यातून जमा झालेल्या पीएफची माहिती आणि त्यासंबंधीचा तपशील मिळेल.

या सेवेचा ईपीएफओच्या ३.५४ कोटी अंशधारक, ४९.२२ लाख पेन्शधारक अशाणि ६.१ लाख कर्मचा-यांना लाभ मिळणार आहे. या योजनेचा शुभारंभ केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी हैदराबाद येथे केंद्रीय न्यास बोर्डाच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला केला. या योजनेचा पीएफधारक, पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे.

Leave a Comment