हवेतील प्रदूषण एचआयव्ही, मलेरियापेक्षाही घातक

pollution
न्यूयॉर्क: जगात दरवर्षी हवेच्या प्रदूषणाने अकाली मरण पावणाऱ्यांची संख्या 30 लाख असून ती एचआयव्ही अथवा मलेरियाच्या संसर्गाने मरण पावणाऱ्यांपेक्षा 5 लाखाने अधिक आहे. प्रदूषणाची सध्याची पातळी कायम राहिल्यास सं 2050 पर्यंत हवेच्या प्रदूषणाने बळी जाणाऱ्यांची संख्या 66 लाखांपर्यंत जाईल; असा इशारा ‘जर्नल नेचर’ या नियतकालिकात बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात देण्यात आला आहे.

जर्मनीतील मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्री या संस्थेचे प्रा. जोस लेलिव्हेड यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासकांच्या पथकाने जगाच्या वेगवेगळ्या भागातील वायूप्रदूषणाची कारणे आणि त्यामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंचे प्रमाण याचा अभ्यास करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगभरात प्रदूषित हवेमुळे हृदयरोग, साथीचे रोग आणि फुप्फुसाचा कर्करोग यामुळे अकाली मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याचा या अभ्यासकांचा निष्कर्ष आहे.

हवेच्या प्रदूषणाबाबत विचार करताना प्रामुख्याने वाहनांमुळे आणि औद्योगिक क्षेत्रात होणारे प्रदूषण यावर प्रामुख्याने भर दिला जातो. मात्र चीन, भारत, बांग्लादेश, इंडोनेशिया आणि नेपाळ या देशांमध्ये घरगुती, स्वयंपाकासारख्या वापराच्या उर्जेसाठी हलक्या दर्जाचे, मोठ्या प्रमाणात धूर आणि धूळ उत्पन्न करणारे इंधन वापरल्यामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे; असे हा अहवाल सांगतो.

पूर्व अमेरिका, युरोप, रशिया, टर्की, कोरिया आणि जपान या देशात वाहनांमुळे आणि उर्जानिर्मिती प्रकल्पात होणाऱ्या प्रदूषणापाठोपाठ शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खते, प्राण्यांची विष्ठा व मूत्र यातून उत्सर्जित होणारा अमोनिया हां मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित करीत आहे.

मध्यपूर्वेतील आखाती प्रदेश, उत्तर आफ्रिका मध्य आशिया या प्रदेशात प्रामुख्याने वाळूच्या वादळांमध्ये निर्माण होणाऱ्या धुळीसारखे नैसर्गिक घटक प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत; असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हवेच्या प्रदूषणाला आला घालणे हे केवळ मानवी आरोग्यासाठीच आवश्यक आहे असे नव्हे; तर जागतिक तापमान वाढीशी त्याचा निकटचा संबंध असल्याने एकूण सृष्टीच्या अस्तित्वासाठी ते आवश्यक आहे; हे अहवालात निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment