भारत लंकेला जोडणारा हनुमान सेतू होणार

hanuman
भारत आणि श्रीलंका यांना रस्ता व रेल्वे मार्गाने जोडण्याच्या विषयावर दोन्ही देशांत संमती झाली असून भारत श्रीलंका समुद्राखालून बोगद्यातून अथवा सेतू बांधून जोडण्याविषयी विचार सुरू असल्याचे समजते. समुद्रावरून सेतू बांधण्याचा निर्णय घेतला गेला तर सेतूचे नामकरण हनुमान सेतू असे केले जाणार असल्याचेही समजते. या प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेकडून ५.१६ अब्ज डॉलर्स देण्याची विनंती करण्यात आली असल्याचेही सांगितले जात आहे.

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे नुकतेच भारत भेटीवर येऊन गेले तेव्हा त्यांनीही या प्रकल्पासाठी संमती दर्शविली असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. भारतातील धनुषकोडी पासून श्रीलंकेतील मलाईमन्नार या ठिकाणापर्यंत हा मार्ग होईल. हे अंतर २२ किमी आहे. मार्ग बनल्यानंतर श्रीलंका भारत पर्यटन व्यवसायात वाढ होईलच पण व्यापार वाढीसाठीही हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. या २२ किमीच्या मार्गावर फक्त अडीच किलोमीटर भागातील समुद्र जास्त खोल आहे. या प्रकल्पाबाबत पुढच्या महिन्यात सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय झाला की रेल्वे मंत्रालयालाही त्यात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. बोगदा अथवा पूल कांहीही झाले तरी रेल्वे आणि वाहनांसाठी रस्ता अशा दोन्ही मार्गांचा समावेश केला जाणार आहे.

Leave a Comment